Waterlogging : सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, महापालिका आयुक्तांचे आवाहन

रेल्‍वेमध्‍ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्‍ज ठेवावी. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या. (Waterlogging)

1870
Waterlogging : सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, महापालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात सखल भागातील पाणी साचण्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे. अशा स्थितीचा सामना करण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेसह मुंबईतील सर्व यंत्रणांची आहे. पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून योगदान दिल्यास कोणतीही आव्हानात्मक स्थिती एकत्रित प्रयत्नाने टाळता येईल. सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना केले. (Waterlogging)

यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्‍यक्षतेखाली बुधवारी १० एप्रिल २०२४ महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न झाली. मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्‍प) अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, पोलीस सह आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ, महानगरपालिकेचे सह आयुक्‍त (सामान्‍य प्रशासन) मिलिन सावंत, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांच्‍यासह सातही परिमंडळांचे उप आयुक्‍त, सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Waterlogging)

मध्य व पश्चिम रेल्‍वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तट रक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण (एनडीआरएफ), मुंबई वाहतूक पोलिस, महाराष्‍ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्‍हाडा), राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्‍ल्‍यूडी), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्‍मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक (बेस्‍ट), टाटा पॉवर, अदानी एनर्जी आदींच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते. मुंबई महानगरपालिकेच्‍या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. (Waterlogging)

उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू रहावी, याची काळजी घ्या-

रेल्वे आणि महानगरपालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून कामकाज केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या स्वच्छतेची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमिगत जल-साठवण टाक्यांची उभारणी केली. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने सर्व कामे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, रेल्‍वेमध्‍ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्‍ज ठेवावी. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या. (Waterlogging)

मुंबईतील ४८१ ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप-

जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदादेखील शहर आणि उपनगरात मिळून ४८१ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत. त्‍यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले. (Waterlogging)

विभाग पातळीवरील नियंत्रण कक्ष सुसज्‍ज ठेवा–

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात २५ विभाग पातळीवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. हे समर्पित नियंत्रण कक्ष सर्व उपकरणांसह सुसज्‍ज ठेवावेत, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सर्व सहायक आयुक्‍तांना दिल्या. (Waterlogging)

(हेही वाचा – Narendra Modi Ramtek : …तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का ?; पंतप्रधानांचा रामटेकमधून काँग्रेसवर हल्लाबोल)

दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी उपाययोजना करा–

मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत. याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच, डोंगरमाथा, डोंगरउतारावर राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस बजवाव्‍यात व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्याव्यात. त्‍यांना आपत्तीसमयीचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. (Waterlogging)

राडारोडा उचलावा अन् रस्‍ते वाहतूक सुरळीत करावी–

एमएमआरडीएच्या अखत्यारित विविध कामे आणि मेट्रो रेल्वे इत्यादी प्रकल्पांच्या ठिकाणी कोणताही राडारोडा पडून राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. प्रत्येक विभागातील सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील राडारोडा काढण्यासाठीचा समन्वय त्या-त्या यंत्रणेशी साधावा. तसेच, वाहतूक पूर्ववत होण्‍याकामी, स्थानिक कामे झाल्‍यावर बॅरिकेड्स काढावीत, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या. (Waterlogging)

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांची देखभाल काटेकोरपणे करा-

मुंबई पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे दोन्ही द्रुतगती मार्ग सुस्थितीत असावेत, याची खबरदारी मध्यवर्ती यंत्रणेसह सहायक आयुक्‍त आणि उप आयुक्तांनी घ्यावी. द्रुतगती मार्गावर कामाची देखरेख विभागीय पातळीवर काटेकोरपणे व्हावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. (Waterlogging)

एनडीआरएफ, भारतीय नौदल, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना–

या बैठकीला उपस्थित असणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्यांनी पावसाळ्याच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफचे ३ पथक सज्ज असणार आहेत. तर पूर्व उपनगरासाठी अतिरिक्त पथक तैनात ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिल्या. भारतीय नौदलालाही त्यांची पथके आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अग्निशमन दलानेही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले. (Waterlogging)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.