कुर्ला भागातील पाणी समस्या होणार दूर

132

कुर्ला भागातील पाणी समस्या आता कायमचीच निकालात निघणार असून नवजीवन सोसायटी आणि महाराष्ट्र स्टोर येथे २ इंच व्यासाच्या वाढीव जल वाहिन्या टाकण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय परिसरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर कायम स्वरूपी उपाय योजना राबवण्यासाठी १२.५ लाख लिटर क्षमतेचे होमगार्ड ट्रेनिंग सेंटर व १४ लाख लिटर क्षमतेच्या फिनिक्स मॉल येथे भूमिगत शोषण टाक्या व पंपिंग स्टेशन बनवण्यात येत असून ही प्रकल्प कामे लवकरच हाती घेण्यात येत असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेला रासु यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले भांदिग्रे ?

कुर्ला येथील भाजप नगरसेवक हरिष भांदिग्रे यांनी विभागातील पाणी समस्येबाबत आवाज उठवताना म्हणाले, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून चांगले काम करतो. परंतु आता निवडणुका सुरू होणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली, आणि जर यावर योग्य तोडगा काढला नाही तर आपण एवढी वर्षे जे प्रमाणिकपणे काम केले आहे ते पाण्यात जाते. त्याचा काहीच फायदा होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आम्ही पाणी मागितले तर आमच्या विरोधात एफआयआर दाखल केला जातो, असेही भांदिग्रे म्हणाले.

( हेही वाचा : आजारपणाला महागाईची झळ, औषधांमध्ये २० टक्क्यांची दरवाढ )

आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

जलाभियंता विभागाकडे एफआयआर दाखल करण्याची वेळ आहे. पण त्यांना कुर्ला एल विभागातील लोकांना पाणी द्यायला वेळ नाही. याबाबत अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु हे स्पष्टीकरण देताना म्हणाले, नगरसेवक हरिष भांदिग्रे यांच्या प्रभाग क्रमांक १६४ मध्ये, घाटकोपर उच्च स्तरीय जलाशय व पवई निम्न व उच्च स्तरीय जलाशयामधून पाणी पुरवठा केला जातो. यापैकी जल वितरण जाळ्याच्या शेवटच्या टोकाशी व उंचावर वसलेल्या परिसरातील झोपडपट्टी धारकांना काही तांत्रिक कारणांमुळे कधी कधी अपुऱ्या पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी या सेवा जलाशयांमधील पाण्याची पातळी नियंत्रित करणे व जलवितरण वाहिन्यामध्ये झडपांद्वारे पाणी पुरवठा आवश्यकतेनुसार नियंत्रित करुन पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.

तसेच नवजीवन सोसायटी आणि महाराष्ट्र स्टोर येथे २ इंच व्यासाच्या वाढीव जल वाहिन्या टाकण्याची कामे प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर कायम स्वरूपी उपाय योजने करिता १२.५ लाख लिटर क्षमतेचे होमगार्ड ट्रेनिंग सेंटर येथे व १४ लाख लिटर क्षमतेचे फिनिक्स मॉल येथे भूमिगत शोषण टाक्या व स्टेशनची प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.