Veer Savarkar Jayanti 2023 : वीर सावरकर : शिवरायांचा निष्ठावंत मावळा

सावरकर म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्रक्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेपर्यंत झुंजेन. यशस्वी झालो तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे भारतमातेच्या मस्तकावर स्वातंत्र्याचा दैदिप्यमान मुकुट चढवेन! अपयशी ठरलो तर चापेकर बंधूंप्रमाणे हसत हसत फासावर जाईन.

132
  • दुर्गेश जयवंत परुळकर

छत्रपती शिवरायांचे श्रेष्ठत्व नेमकेपणाने व्यक्त करताना सावरकर हिंदू पदपादशाही या ग्रंथात लिहितात. हिंदूंच्या राजकीय भाग्याला जी महत्त्वाची आणि विजयप्रवर्तक कलाटणी मिळाली तिचे श्रेय शिवाजी महाराज आणि त्यांचे अध्यात्मिक गुरु श्री रामदास स्वामी यांनी आपल्या हिंदुजातीपुढे जे थोर अध्यात्मिक आणि राष्ट्रीय ध्येय ठेवले त्या ध्येयाला जितके आहे तितकेच त्यांनी समरक्षेत्रात उपयोगात आणलेल्या नवीन डावपेचाच्या युद्धपद्धतीला व शस्त्र साधनांना आहे. महाराष्ट्रधर्म ही हिंदू जातीच्या राष्ट्रीय जीवनाची मृतप्राय झालेली ज्योत प्रज्वलित करणारी एक नवीन शक्ती होती हे जितके सत्य आहे तितकेच महाराष्ट्र युद्धपद्धती त्याकाळी हिंदू लोकात प्रचलित असलेल्या युद्ध शास्त्रात क्रांती घडवणारी नवीन युद्धपद्धती होती हे खरे आहे. शिवरायांची युद्धनीती आणि शिवरायांचे ध्येय हाच सावरकरांना सशस्त्र क्रांतीच्या मार्गावरून वाटचाल करताना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभासारखा वाटला.

शिवरायांच्या काळात मुसलमानांची सत्ता हिंदूंना त्राही भगवान करून सोडत होती. या सत्ता नष्ट करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांसह शपथ घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळात ब्रिटिश सरकारने अनन्वित अत्याचार केले. देशाची आर्थिक लूट केली.

आपली परमप्रिय भारतमाता पुन्हा परकीय सत्तेच्या टाचेखाली घुसमटताना सावरकरांनी पाहिली. शिवरायांप्रमाणेच आपणही आपल्या भारतमातेच्या मुक्ततेसाठी सशस्त्र लढा दिला पाहिजे, ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव सावरकरांना बालवयातच झाली.

शिवरायांनी इस्लामिक सत्ता नष्ट करण्यासाठी शिव शंकराला साक्षी ठेवून शपथ घेतली होती. त्यावेळी शिवराय केवळ पंधरा वर्षांचे होते. सावरकरांनी सुद्धा घरातल्या अष्टभुजा देवीसमोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी शपथ घेतली. त्यावेळी सावरकरांचे वय पंधरा वर्षांचे होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही शपथ घेताना सावरकर म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्रक्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेपर्यंत झुंजेन. यशस्वी झालो तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे भारतमातेच्या मस्तकावर स्वातंत्र्याचा दैदिप्यमान मुकुट चढवेन! अपयशी ठरलो तर चापेकर बंधूंप्रमाणे हसत हसत फासावर जाईन.

(हेही वाचा Veer Savarkar : भाषाशुद्धीचा आग्रह धरणाऱ्या वीर सावरकरांच्या जन्मस्थळी भगूर नगरपालिकेकडून मराठीचे वाभाडे )

शिवरायांनी मी या देशाचा आणि हा देश माझा आहे ही भावना आपल्या बांधवांच्या मनात निर्माण केली. राष्ट्रकार्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट सहजतेने बाजूला सारण्याची प्रेरणा शिवरायांनीच आपल्या मावळ्यांना दिली. घरचे लग्नकार्य बाजूला ठेवून राष्ट्रासाठी लढायला सिद्ध झालेला तान्हाजी शिवरायांनी निर्माण केला.

शिवचरित्रातल्या या आणि अशा अनेक घटना सावरकरांना प्रेरित करत होत्या. म्हणूनच सावरकर बंधूंनी सुद्धा कौटुंबिक जीवनापेक्षा राष्ट्रीय जीवनाला प्राधान्य दिले. स्वातंत्र्य समराच्या यज्ञकुंडात आपली ही समिधा पडली पाहिजे आणि हा स्वातंत्र्याचा यज्ञकुंड सतत धगधगत ठेवला पाहिजे म्हणून संपूर्ण सावरकर कुटुंब भारतमातेच्या चरणी समर्पित झाले. ते केवळ शिवरायांच्या प्रेरणेमुळे.

हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी परकीय मुसलमानी सत्तेला उलथून पाडण्यासाठी, स्वतंत्र आणि समर्थ असे हिंदवी साम्राज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांनी अमूलाग्र हिंदू चळवळ केली. शिवरायांची ही चळवळ सावरकरांना अखंड हिंदुस्थान स्थापन करण्यासाठी प्रेरणा देत होती हे विसरून चालणार नाही. म्हणूनच सावरकर कोणत्याही यादवीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होते.

शिवरायांनी त्यांच्या काळातल्या इस्लामिक सत्तांना आपल्या टाचेखाली दाबून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा हा शौर्याचा पराक्रमाचा वारसा आपणच शौर्याने, पराक्रमाने जतन करायला हवा. या जाणिवेने प्रेरित होऊन ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची संघटना उभारली. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेने ब्रिटिश सरकारची झोप उडवली. शिवरायांच्या युद्धनीतीचे सूत्र सावरकरांनी आत्मसात केले होते. म्हणूनच दुसरे महायुद्ध जवळ येऊन ठेपले असताना सावरकरांनी आपल्या देशातल्या तरुणांना सैन्यात भरती होण्यास सांगितले. याच सैनिकांनी संकटात सापडलेल्या ब्रिटिश सरकारला कोंडीत पकडले आणि देश स्वतंत्र केला. सावरकरांची ही रणनीती शिवरायांच्या युद्धनीतीचे स्मरण करून देण्यास पुरेशी आहे.‌ सावरकरांचे आणि छत्रपती शिवरायांचे चरित्र पाहिले तर आपल्याला निश्चितपणे असे अनुमान काढता येते की स्वातंत्र्यवीर सावरकर हा छत्रपती शिवरायांचा निष्ठावान मावळा आहे.

(लेखक सावरकर साहित्याचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.