Veer Savarkar Jayanti 2023: डोंगरी कारागृह आणि वीर सावरकरांच्या स्मृती

162
डोंगरी कारागृह आणि वीर सावरकरांच्या स्मृती
डोंगरी कारागृह आणि वीर सावरकरांच्या स्मृती

अविनाश धर्माधिकारी

दक्षिण मुंबईमध्ये डोंगरी या विभागामध्ये ब्रिटिश काळापासून एक भलीमोठी भव्य अशी ऐतिहासिक परंतु दुर्लक्षित वास्तू आहे, ती म्हणजे डोंगरी बाल सुधारगृह. सुमारे १०,००० स्क्वेअर यार्ड एवढ्या मोठ्या विस्तीर्ण परिसरामध्ये हे डोंगरी बालसुधारगृह वसलेले आहे. १८०४ मध्ये ब्रिटिशांनी ही वास्तू बांधली तेव्हा त्याचा उपयोग स्वातंत्र्यसंग्रामातील आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना कैद करण्याकरता केला जात होता, त्याला उमरखाडी जेल असे नाव होते. या जेलमध्ये १८८२ मध्ये बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर तर १९११ मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना कैद करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर अंदमानला पाठवण्यापूर्वी त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांच्याशी शेवटची भेट याच कारागृहामध्ये घडली होती. कालांतराने या वास्तूचा उपयोग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लहान मुलांसाठी एक वेगळे जेल ज्याला बाल सुधारगृह असे संबोधण्यात आले ते चालू करण्यात आले. या ठिकाणी ब्रिटिशांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या काही खोल्या जतन करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये लोकमान्य टिळक, आगरकर आणि वीर सावरकर यांना कैद करण्यात आले होते. त्या खोल्यांमध्ये त्यांच्या तस्वीर लावून जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त छोटे मोठे कार्यक्रम घेतले जातात.

एका भागामध्ये बाल सुधारगृह आहे आणि एका बाजूला या जेलच्या खोल्या आहेत हा सर्व परिसर प्रतिबंधित असल्यामुळे सर्वसाधारण लोकांना या ठिकाणी प्रवेश मिळू शकत नाही. त्यामुळे एवढी मोठी ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित राहिली आहे.‌ त्या ठिकाणी सर्वसाधारण लोक दर्शनार्थ किंवा अभ्यासासाठी, माहितीसाठी जाऊ शकत नाहीत. दुर्दैवाने या जेलच्या इतिहासाबाबत शासकीय स्तरावर फार कमी दस्तऐवज उपलब्ध आहेत. त्यामुळे या जेलबाबत अधिकृत माहिती फार कमी उपलब्ध आहे, या जेलचा इतिहास अंधारातच राहिला आहे. असे असले तरी आता सरकारने तो इतिहास जागवण्याच्या दृष्टीने हे ऐतिहासिक स्थळ सुशोभिकरण आणि सर्वसाधारण लोकांना दर्शनार्थ खुले करण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकलेली आहेत. ही गोष्ट खूपच स्वागतार्ह आहे.‌

मी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असताना, सन २०१८ मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर डोंगरी पोलीस ठाणे येथे माझी नेमणूक झाली.‌ डोंगरी बाल सुधारगृह हे डोंगरी पोलीस स्टेशनपासून केवळ पाचशे मीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे बाल सुधारगृहात बाल-न्यायालय देखील आहे. त्या ठिकाणी पोलिसांची ये – जा असते, परंतु कोणीही या ऐतिहासिक वास्तूबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझी नेमणूक झाल्यानंतर मी पहिल्या आठ दिवसातच बाल सुधारगृहाला भेट दिली, त्यावेळेस सौ. पाटील या बालसुधारगृहाच्या अधीक्षक होत्या. त्यांच्यामार्फत सर्व सुधारगृहाची माहिती घेतली, तसेच या ऐतिहासिक वास्तूमधील जतन केलेल्या खोल्यांना भेट दिली, लोकमान्य टिळक, आगरकर आणि वीर सावरकर यांच्या तस्वीरीला नमन केले आणि तेव्हाच निश्चय केला की, या ऐतिहासिक खोल्यांना त्यांचे महत्त्व प्राप्त करून देण्याचे दृष्टीने आणि सर्वसाधारण जनतेला त्याचे महत्त्व पटवून देण्याचे दृष्टीने काही ना काही तरी प्रयत्न करायचे. याकरिता मी सर्वप्रथम आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना त्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती परेडवेळी करून देऊ लागलो. त्यांना उद्युक्त केले की त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत त्या वास्तूला भेट द्यावी आणि आपला इतिहास माहिती करून घ्यावा. त्यानंतर माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी बालसुधारक यामध्ये जाऊन मुलांच्या समवेत भोजनाचा आस्वाद घेतला आणि काही काळ त्यांच्या बरोबर व्यतीत केला. त्याचप्रमाणे त्या ऐतिहासिक खोल्यांना पण भेट दिली आणि सर्व पोलिसांना त्याची महती आणि माहिती दिली. त्यानंतर आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे देखील त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त बालसुधारगृहाला भेट देऊ लागले.

(हेही वाचा – वीर सावरकरांच्या कवितेतील ‘मी’…)

एवढे करून चालणार नव्हते याकरता सामाजिक जनजागृती करणे आवश्यक होते, हे लक्षात घेऊन मी विलेपार्ले येथील ५५ प्रतिष्ठित व्यक्तींची एक सहल आयोजित केली. त्यावेळेस बालसुधारकाचे अधीक्षक म्हणून राहुल कंठीकर हे कार्यरत होते ते अतिशय सकारात्मक विचार करणारे आणि त्यांच्या मनात देखील या वास्तूचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या सहकार्याने या सर्व विलेपार्ल्यातील प्रतिष्ठित लोकांना संपूर्ण बालसुधारगृहाची सहल घडवली. त्या ऐतिहासिक खोल्यांमध्ये नेऊन लोकमान्य टिळक, आगरकर आणि वीर सावरकर यांच्या तस्वीरीला नमन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर डोंगरी पोलीस ठाणे येथे त्यांच्याकरता सुग्रास भोजनाचे आयोजन केले होते. पोलिसांकडून असा उपक्रम त्यांना अपेक्षित नव्हता, त्याचप्रमाणे असे आदरातिथ्य देखील त्यांनी अपेक्षित केले नव्हते. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम झाला आणि काही व्यक्ती, काही संस्था पुढे आल्या आणि त्यांनी बाल सुधारगृहातील या ऐतिहासिक खोल्यांचे पुनर्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

या दरम्यान मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना देखील निमंत्रित केले.‌ त्यांनी मंजिरी मराठे यांच्या समवेत प्रथम ज्या ठिकाणी वीर सावरकरांना कैद केले होते त्या खोलीचे दर्शन घेतले त्यावेळेस ते खूप भावूक देखील झाले होते.‌

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ आणि स्वातंत्र्यवीर वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती, शिवाजी पार्क या दोन्ही संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यामध्ये मी समन्वयाचे काम केले. आम्ही त्या दृष्टिकोनातून पावले उचलली, सर्व संबंधितांनी त्या स्थळाला भेट देऊन पाहणी केली, अपेक्षित फेरबदल, सुधारणा करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. आर्थिक पाठबळाच्या दृष्टीने प्रयत्न केले, पण दुर्दैवाने कोरोना विषाणूची साथ पसरली आणि ते काम तिथेच थांबले.

आता महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन या वास्तूचे सुशोभिकरण, सर्वसामान्यांसाठी भेट देण्याची सोय आणि इतर सुख सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.

(लेखक महाराष्ट्र पोलीस दलातील निवृत्त पोलीस उपाधीक्षक आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.