Veer Savarkar : वीर सावरकरांचा 18 फुटांचा पुतळा पोर्टब्लेअर विमानतळावर; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार अनावरण

स्वातंत्र्यवीर विनायम दामोदर सावरकर यांचा 18 फुटांचा पुतळा तयार झाला असून तो गेल्या 22 मे रोजी विमानतळावर बसविण्यात आला आहे.

161
  • वंदना बर्वे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 18 फुटांचा पुतळा पोर्टब्लेअर विमानतळावर बसविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या उद्घाटनासोबतच वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे, अशी माहिती आहे. हा पुतळा पद्मविभूषण राम सुतार यांनी बनविला आहे.

राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अंदमान निकोबारची राजधानी पोर्टब्लेअर येथील वीर सावरकर या विमानतळावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला होता. प्राधिकरणाने हा पुतळा बनविण्याची जबाबदार प्रख्यात मूर्तीकार पद्म विभूषण राम सुतार यांना दिली होती.

अनिल सुतार यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर विनायम दामोदर सावरकर यांचा 18 फुटांचा पुतळा तयार झाला असून तो गेल्या 22 मे रोजी विमानतळावर बसविण्यात आला आहे. सध्या पोर्टब्लेअर येथील वीर सावरकर विमानतळाच्या नवीनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा प्राधिकरणाच्या अधिका—यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. सोबतच मोदी सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सुध्दा करणार आहेत.

(हेही वाचा Punjab : पंजाबमध्ये पुन्हा अकाली शिरोमणी दल-भाजपची युती होण्याची शक्यता)

…आणि सावरकर यांच्या फोटोच्या जागी त्यांची मूर्ती आली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच भव्यदिव्य पध्दतीने साजरा करण्यात आला. तसं बघितलं तर, महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी फोटोला माल्यार्पून करून आदरांजली वाहिली जाते. परंतु यंदा सावरकर यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. नवीन महाराष्ट्र सदनात खूप मोठ्या प्रमाणावर पुष्प सजावट करण्यात आली होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फोटोच्या जागी तीन फुटांची मूर्ती ठेवण्यात आली होती. ही मूर्ती पोर्टब्लेअर येथे बसविण्यात आलेल्या 18 फुटांच्या पुतळ्याची प्रतिकृती होय, हे येथे उल्लेखनीय. जयंतीदिनी सावरकर यांची मूर्ती आणण्याची योजना महाराष्ट्र सदनचे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ. राजेश अडापवर यांची होती. डॉ. अडापवार यांनीच आपल्याला फोन करून सावरकर यांची मूर्ती आहे काय? अशी विचारणा केली होती. आपल्याकडे तीन फुटांची मूर्ती आहे असे त्यांना सांगितले आणि ते ही मूर्ती जयंतीदिनासाठी घेवून गेलेत, असे अनिल सुतार यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.