Temple Conference : धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या; सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचे आवाहन

116
Temple Conference : धर्म आणि मंदिरे यांसाठी 'मंदिर रक्षक' म्हणून एकत्र या; सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचे आवाहन
Temple Conference : धर्म आणि मंदिरे यांसाठी 'मंदिर रक्षक' म्हणून एकत्र या; सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचे आवाहन

मानसन्मान बाळगून मंदिरांचे प्रश्न सुटणार नाहीत. मंदिरांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर मंदिरात येतांना आणि धर्मासाठी कार्य करतांना ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या. एकत्र आलो तरच हिंदूंचा आवाज ऐकला जाईल, अशा प्रकारे हिंदूंना संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी केले. माणगांव येथील प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पवित्र भूमीत श्री दत्त मंदिर न्यासाच्या सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. महाराष्ट्र मंदिर महासंघ (Maharashtra Mandir Mahasangh), श्री दत्तमंदिर न्यास आणि हिंदु जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, पुरोहित आणि मंदिरांचे खटले लढवणारे अधिवक्ता असे ३७५ हून अधिक जण अधिवेशनात सहभागी झाले होते. (Temple Conference)

(हेही वाचा – Abu Dhabi Temple : इस्लामिक देशात हिंदु मंदिराची उभारणी, वैश्विक हिंदु राष्ट्र निर्मितीची नांदी; सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ यांचे उद्गार)

या उद्घाटन सत्राच्या वेळी व्यासपिठावर माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, देवस्थान सेवा समितीचे (विदर्भ) सचिव अधिवक्ता अनुप जैस्वाल, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट उपस्थित होते.अधिवेशनाला उपस्थित विश्वस्तांनी मंदिराच्या समस्या, मंदिरांचे व्यवस्थापन, विश्वस्तांची कर्तव्ये, मंदिर विश्वस्तांचे संघटन आदींविषयी मार्गदर्शन केले. विरार येथील श्री जीवदानी देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर यांनी मंदिराचे आर्थिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. पुढील कार्याच्या दृष्टीने कार्यक्रमही अधिवेशनात निश्चित करण्यात आला. श्रीदेव वेतोबा देवस्थान (वेंगुर्ला), श्रीदेव रामेश्वर देवस्थान (मालवण), श्रीदेवी केपादेवी देवस्थान (उभादांडा), श्रीदेव बांदेश्वर (सावंतवाडी), श्री आदीनारायण देवस्थान (वेगुर्ला) आदी देवस्थानचे विश्वस्त अधिवेशनात सहभागी झाले होते. या वेळी लखमराजे भोसले म्हणाले, ‘‘मंदिराच्या रक्षणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. मंदिरात प्रवेश करतांना भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करायला हवे. सिंधुदुर्गामधील मंदिरांच्या विश्वस्तांनी संघटित व्हायला हवे. यासाठी तालुक्यातालुक्यांतून संघटन व्हायला हवे.’’

सिंधुदुर्गातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थानची २७७ मंदिरे भक्तांकडे द्या ! – सुनील घनवट

सिंधुदुर्गातील मंदिरांसाठी हिंदू संघर्ष करत आहेत; परंतु हा संघर्ष व्यक्तीगत पातळीवर चालू आहे. संकुचित विचार ही हिंदूंची समस्या आहे. जेव्हा सिंधुदुर्गातील मंदिरांसाठी देशभरातील हिंदू आवाज उठवतील, अशा व्यापक संघटनामुळे मंदिराच्या समस्या सुटतील. आपापसांतील वादविवाद आणि मानापमान यांवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मंदिरे बंद आहेत. अशाप्रकारे मंदिरे बंद असणे, ही गोष्ट दुर्दैवाची आहे. आपल्यातील मतभेदाचा हिंदु धर्मविरोधी शक्ती लाभ घेणार नाहीत, यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७७ मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत.

(हेही वाचा – Jammu University Distance Education : जम्मू युनिव्हर्सिटी डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम्सबद्दल तुम्हाला 5 गोष्टी माहित असणे आवश्यक आहे)

मंदिरांचा विकास करणे, हे विश्वस्तांचे कर्तव्य ! – दिलीप देशमुख

भरताने अयोध्येचा राज्यकारभार प्रभु श्रीरामांच्या वतीने चालवला. त्याप्रमाणे विश्वस्तांनी मंदिरांचा कारभार सेवक म्हणून चालवावा. मंदिरांचा मालक स्वत: भगवंत आहे, हे विश्वस्तांनी लक्षात घ्यावे. विश्वस्तांना मंदिराच्या संपत्तीची हानी करण्याचा अधिकार नाही. विश्वस्तांमधील आपापसांतील वादामुळे देवस्थानच्या जमिनी अन्यांच्या कह्यात जात आहेत. त्यामुळे देवस्थानच्या चल-अचल संपत्तींचे जतन करणे, हे विश्वस्तांचे दायित्व आहे.

मंदिराची भूमी कूळ कायद्याद्वारे जावू नये, यासाठी सर्तक रहावे ! – अनुप जैस्वाल

मंदिरांची डागडुजी आणि व्यवस्थापन यांसाठी विदर्भ देवस्थान समितीला मिळालेली भूमी कूळ कायद्याद्वारे त्रयस्त व्यक्तींच्या कह्यात देण्यात आला होती. ही भूमी देवस्थानला पुन्हा प्राप्त करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण आणि उच्च न्यायालय यांकडे पाठपुरावा केला. कायदेशीर लढा देऊन मंदिराची भूमी आम्ही पुन्हा प्राप्त करून घेतली. कूळ कायद्याद्वारे गेलेली 1 हजार 200 एकर भूमी पुन्हा विदर्भ देवस्थान समितीला मिळवून देण्यात आम्हाला यश आले आहे. कूळ कायद्याद्वारे राज्यातील अनेक देवस्थानांच्या भूमी अन्य व्यक्तींच्या कह्यात गेल्या आहेत. मंदिराची भूमी कूळ कायद्याद्वारे जावू नये, यासाठी सर्तक रहावे.

मंदिर संस्कृती पुनरूज्जीवित करण्याचे कार्य आपणाला करायचे आहे ! – सद्गुरु स्वाती खाडये

प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जीवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. मंदिरात मोठ्या प्रमाणात येणार्या हिंदू समाजाचे जन्महिंदूंपासून कर्महिंदूंमध्ये रूपांतर करण्याचे महत्कार्य मंदिराच्या माध्यमातून होऊ शकते. मंदिरे ही केवळ धर्मस्थळे नाहीत, तर ती एक संस्कृती आहे. त्यामुळे मंदिर संस्कृतीचे पुनरूज्जीवित करण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे.

अधिवेशनाच्या शेवटी राज्यातील मंदिरांचे सरकारीकरणमुक्त करावीत, राज्यातील प्राचीन मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी सरकारने निधी द्यावा, राज्यातील वक्फ बोर्डाने बळकावलेली मंदिराची भूमी संबंधित देवस्थानला द्यावी आणि वक्फ कायदा रहित करावा, असे ठराव या अधिवेशनात करण्यात आले. (Temple Conference)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.