Igatpuri : आदिवासी भागाची दयनीय अवस्था; रुग्णालयात पोहोचण्यासाठी पायपीट करतानाच गर्भवतीचा मृत्यू

87

इगतपुरीसारख्या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यात विकासाच्या वल्गना करणाऱ्या शासन यंत्रणेच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना चांगलाच बसत आहे. सरकार आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे इगतपुरी तालुक्यातील तळोघ जुनवणेवाडी येथील गरोदर महिलेला प्राण गमवावा लागला आहे. या गावाला रस्ता नसल्याने संबंधित गरोदर महिला आपल्या नातेवाईकांसह पहाटे अडीच वाजता अडीच किमी पायी चालत दवाखान्यापर्यंत पोहोचली. मात्र पायपीट, प्रसूतीवेदना, पाऊस यामुळे झालेल्या विलंबामुळे महिलेने दवाखान्यात प्राण सोडला.

गावात तातडीने रस्ता करण्याची मागणी

तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी सुद्धा चक्क झोळी करून तिला आज दुपारी नेण्यात आले. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाला लाजिरवाणी असणारी ही घटना असून गावात तातडीने रस्ता करावा, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी केली आहे. तळोध ग्रामपंचायत हद्धीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना अडीच किमी अतिशय कच्च्या रस्त्याने यावे लागते. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे. जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली. जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला डोली करून त्यामध्ये झोपवण्यात आले. अखेर दवाखान्यात पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घरी नेण्यासाठी सुद्धा रस्त्याची समस्या असल्याने डोली करून न्यावे लागले. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. गरज नसलेल्या भागात कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात येत असतात. मात्र, जुनवणेवाडीसारख्या अनेक गावांत रस्ताच नसल्याने अनेक निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो.

(हेही वाचा Jail : आरोपींना आजही ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची अन्यथा तुरुंगात ‘नो एन्ट्री’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.