गोखले पुलाचे बांधकाम सुरु असल्यानेयंदाच्या पावसाळ्यात अंधेरी आणि मिलन भूयारी मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. या दोन्ही परिसरातील या वाढत्या वाहतुकीचा विचार करता यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी पावसाचे पाणी साचू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन आणि उपाययोजना करण्यात आली आहे.
पश्चिम उपनगरातील पावसाळापूर्व उपाययोजना म्हणून सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी शनिवारी १७ जून २०२३ केली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीष कुमार पटेल, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे आणि इतर संबंधित अधिकारी देखील या दौऱ्यास उपस्थित होते.
अंधेरी भुयारी मार्गासाठी उपाययोजना करा
पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी अंधेरी भूयारी मार्ग येथे अधिक क्षमतेचे पंप लावण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केली. या परिसरात जलदगतीने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप, फ्लड गेट कामाची पाहणी त्यांनी केली. जोरदार पावसाच्या काळात पाणी साचू नये म्हणून यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागास दिले.
अंधेरी भुयारी मार्ग परिसरासाठी एकूण तीन ठिकाणी मिळून सहा पाणी उपसा करणारे पंप आणि फ्लड गेटची यंत्रणा उभारण्यात आली आहे. अंधेरी परिसरातील मिलेनियम इमारत, विरा देसाई मार्ग, अंधेरी भूयारी मार्ग परिसरात ही यंत्रणा उभारली आहे. ताशी ३ हजार मीटर क्युबिकचे सहा पंप तीन ठिकाणी लावण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागाने पूर्ण केले आहे. तर १ हजार मीटर क्युबिकचे २ पंप लावले आहेत.
मिलन भुयारी मार्गाला यंदा दिलासा
सांताक्रुझ येथील मिलन भूयारी मार्ग परिसरातील पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी भूमिगत पाणी साठवण टाकी कामाची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केली. यंदा अतिरिक्त पंपाची व्यवस्था याठिकाणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सांताक्रुझ परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी व्यक्त केला.
गोखले पूल वाहतूक खुली करण्यासाठी डिसेंबरचे उद्दिष्ट
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणा-या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देखील त्यांनी आढावा घेतला. रेल्वे परिसरातील स्टील गर्डर निर्मितीची सद्यस्थिती जाणून घेण्यासह आगामी काळातील रेल्वे ब्लॉकचे नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांनी सूचना दिल्या. महानगरपालिकेच्या हद्दीतील पुलाच्या भागात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून दुतर्फा ध्वनी प्रतिबंधक (साऊंड बॅरियर्स) लावण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. दुतर्फा वाहतूक सुरू करण्यासाठी डिसेंबर २०२३ चे उद्दिष्ट ठेवा, अशाही सूचना त्यांनी पूल विभाग आणि रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.
रस्ते देखभालीसाठी यंत्रणेला सूचना
जोगेश्वरी-विक्रोळी जोडमार्गाच्या सुरूवातीला मास्टिकचा वापर करून रस्ता पृष्ठीकरण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी रस्ते विभागाला दिले. त्यासोबतच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Join Our WhatsApp Community