नवीन कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी व्यवस्था करण्याचा विचार

कोविड सेंटरमध्येही काही कक्ष हे लहान मुलांसाठी तयार करण्याचाही विचार सुरू असून, लवकरच याबाबतचा निर्णय प्रशासनाच्या स्तरावर घेतला जाणार आहे.

61

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग अधिक असण्याची भीती वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईतील कोविड सेंटरमध्ये लहान मुलांच्या बेडसह एनआयसीयूंची व्यवस्था करण्याचा विचार प्रशासन करत आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या जंबो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे.

तिस-या लाटेत लहान मुलांना धोका

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु येत्या जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. घरातील प्रौढ व्यक्तींमध्ये तीव्र लक्षणे असल्याने, मुलांनाही संसर्ग होऊ शकतो. जरी लहान मुलांना जास्त त्रास होत नसला, तरीही ते संसर्गाचे वाहक ठरू शकतात, असे बोलले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही लहान मुलांच्या दृष्टीकोनातून कोविड सेंटरमध्ये व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना केली होती. तसेच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ३० एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून विविध राज्यांमधील लहान मुलांच्या कोरोना संसर्गाची आकडेवारी देऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. दहा वर्षांखालील लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही केल्या होत्या.

(हेही वाचाः तिसऱ्या संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी!)

कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी कक्षाचा विचार

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची व्यवस्था कुठे करावी, याबाबत प्रशासन विचार करत आहे. सध्या कांजूरमार्ग, मालाड, शीव सोमय्या मैदान व महालक्ष्मी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे. या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमध्ये न्युओनेटल व्हेटिंलेटरसह एनआयसीयू उभारण्यात यावेत, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, त्याबरोबरच कोविड सेंटरमध्येही काही कक्ष हे लहान मुलांसाठी तयार करण्याचाही विचार सुरू असून, लवकरच याबाबतचा निर्णय प्रशासनाच्या स्तरावर घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.