बाबरीचा विध्वंस संतप्त जमावाकडून; आरोपी निर्दोष – विशेष न्यायालय 

89
लखनऊ –  ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद संतप्त जमावाने पाडली, त्यावेळी या खटल्यात जे आरोपी आहेत ते सर्व उलट जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी बाबरीचा विध्वंस  थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु जमावाने बाबरी विध्वंस केली, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. यादव यांनी या प्रकरणातील सर्वच्या सर्व हयात असलेल्या ३२ आरोपींना निर्दोष ठरवले. या खटल्यात एकूण ४९ आरोपी होते, त्यातील १७ आरोपींचे निधन झाले आहे.

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपाचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जो ऐतिहासिक निर्णय देऊन विवादित जमीन राम मंदिराला दिली, त्या निर्णयाचे पुढचे पाऊल म्हणजे आजचा निर्णय. श्री रामाचे भव्य मंदिर हे माझे स्वप्न असून त्याचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी झाले आहे. जय श्रीराम!

                                             –  लालकृष्ण अडवाणी, भाजप नेते

बुधवारी न्यायालयाने या ऐतिहासिक खटल्यावर अंतिम निंर्णय दिला. ही घटना पूर्व नियोजित नव्हती, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली, तसेच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही.  केवळ छायाचित्रांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवले जाऊ शकत नाही,  विश्व हिंदू परिषदेनेही यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही,  असेही न्यायमूर्ती यादव म्हणाले.

राम मंदिर आंदोलन एक ऐतिहासिक क्षण होता. कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे, ज्यांनी सुरुवातीपासूनच प्रत्येक स्तरावर न्यायालयात या प्रकरणात योग्य युक्तिवाद केला, त्यांच्या परिश्रमामुळे हा निर्णय आला. राम मंदिर आंदोलन हा अत्यंत महत्वाचा काळ होता, आता राम मंदिरही बनणार आहे. जय श्रीराम!

                                             – मुरली मनोहर जोशी, भाजप नेते

कोण होते आरोपी?

BABARI

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह ३२ जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण ४९ आरोपी होते. मात्र, यातील १७ जणांचे सुनावणीदरम्यान निधन झाले.

मागे घडलेली घटना आता आपण विसरली पाहिजे. बाबरी मशीद पाडलीच नसती तर श्री राम मंदिरासाठी भूमिपूजन आपण पाहिले नसते. मी आणि माझा पक्ष शिवसेना, या निकालाचे स्वागत करतो आणि आडवाणीजी, मुरली मनोहरजी, उमा भारतीजी आणि या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या सर्वांचे अभिनंदन करतो: – संजय राऊत, शिवसेना नेते

आज कोण होते उपस्थित आणि कोण अनुपस्थित?

न्यायालयात निकाल सुनावला जात असताना अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील आजचा दिवस एक खेदजनक आहे. कोर्टाचे म्हणणे आहे कि, हे पूर्वनियोजित कारस्थान नव्हते, मग मला सांगावे नियोजनपूर्व कारस्थान करण्यासाठी आणखी  महिन्यांची तयारी करावी लागते? सीबीआय कोर्टाने घेतलेला निर्णय हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने अयोध्यावरील निर्णयात ‘कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणे’ आणि ‘सार्वजनिक ठिकाणी विध्वंस घडवून आणणे’ असे म्हटले आहे.

                                   – असदुद्दीन ओवैसी, अध्यक्ष, एमआयएम

सीबीआयचा काय होता युक्तिवाद?

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते, १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता. लालकृष्ण अडवाणी यांनी २४ जुलैला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष सीबीआय कोर्टात आपला जबाब नोंदवला होता. यावेळी त्यांना न्यायाधीशांकडून एकूण १०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.