Thane Organ Donation : मृत्यूनंतरही जगण्याची जिद्द; ठाण्यात एका महिलेमुळे ६ जणांना जीवदान!

132
“अवयवदान (Organ Donation) हे श्रेष्ठदान मानले जाते, मात्र दुःखाच्या प्रसंगी असा निर्णय घेणे अत्यंत कठीण असते. आज जेव्हा शेकडो रुग्ण केवळ हक्काच्या अवयवाअभावी मृत्यूशी झुंज देत आहेत, अशा वेळी या कुटुंबाने दाखवलेला समजूतदारपणा समाजासाठी दिशादर्शक ठरते. अशातच ठाण्यातील 38 वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा जणांचे प्राण वाचले आहेत. ठाण्यातील (Thane Organ Donation) ही पहिलीच घटना ठरली असून ठाणे, मुंबई आणि दिल्लीतील रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले आहेत. (Thane Organ Donation)

(हेही वाचा – Pune News : विमाननगरमधील पबवर उत्पादन शुल्क विभागाची धाड; पहाटेच्या कारवाईत ५० जण ताब्यात)

कुटुंबाकडून अवयवदानाचा निर्णय
हाजुरी (Hajuri) येथील रहिवासी असलेल्या या महिलेला मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे 19 डिसेंबरला महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप आशर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. 25 डिसेंबरला डॉक्टरांनी महिलेला ‘ब्रेन डेड’ (Brain dead) घोषित केले. या कठीण काळात डॉक्टरांनी कुटुंबाला अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यावेळी कुटुंबीयांनी आपल्या भावना बाजूला सारून समाजाप्रती असलेल्या कर्तव्याला प्राधान्य दिले.
सहा जणांचा जीव वाचण्यास मदत
26 डिसेंबरला डॉ. विनीत रणवीर (Dr. Vineet Ranveer) आणि त्यांच्या चमूने अवयव काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली. यामध्ये यकृत, दोन मूत्रपिंड (किडनी), हृदय, स्वादुपिंड आणि फुफ्फुस या सहा महत्त्वाच्या अवयवांचे दान करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ (Green Corridor) करण्यात आला होता. ठाण्याहून पवईपर्यंत 17 मिनिटांत या महिलेचे हृदय पोहोचवून एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात आले.
(हेही वाचा – Digvijaya Singh यांच्याकडून संघ आणि भाजपचे कौतुक करत काँग्रेस नेतृत्त्वाचे काढले वाभाडे; शशी थरूर यांच्याकडून समर्थन; काय म्हणाले?)

मृत महिलेच्या मुलीला दोन लाखांचा धनादेश
पाच अवयव मुंबईत, तर एक अवयव ठाण्यातील रुग्णाला प्रत्यारोपणासाठी देण्यात आले. महिलेच्या या उदात्त कार्याचा सन्मान म्हणून जैन ट्रस्ट आणि महावीर जैन हॉस्पिटलतर्फे त्यांच्या 9 वर्षीय मुलीच्या भविष्यासाठी प्रत्येकी एक लाख, असे एकूण दोन लाख रुपयांच्या एफडीचा (fixed deposit) धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ब्रेन डेड झाल्यानंतर ठराविक वेळेत अवयवदान होणे गरजेचे असते. नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती झाल्यास अनेक गरजूंचे प्राण वाचू शकतात, अशी माहिती या रुग्णालयाचे डॉ. विनीत रणवीर यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.