Tata Motors EV : टाटा मोटर्सने आणला इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन ब्रँड

कंपनीकडून कर्व्ह ईव्हीचीही संकल्पना

172
Tata Motors EV : टाटा मोटर्सने आणला इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन ब्रँड
Tata Motors EV : टाटा मोटर्सने आणला इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन ब्रँड
  • ऋजुता लुकतुके

टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील देशातली आघाडीची कंपनी आहे. आता कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी आपला नवा ब्रँड बाजारात आणला आहे, ज्याचं नाव आहे टाटा ईव्ही.

टाटा मोटर्स कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टाटा.ईव्ही (Tata.ev) हा नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. आणि या नवीन ब्रँडचं घोषवाक्य (tagline) आहे, ‘मूव्ह विथ मिनिंग.’ पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरातून समाज हित साधण्याचं कंपनीचं ध्येय यातून अधोरेखित होतं, असं कंपनीचं म्हणणं आहे. तसंच कंपनी या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यासाठी कटीबद्ध आहे, असाही संदेश त्यांना द्यायचा आहे.

लँडॉर अँड फिच कंपनीने टाटा.ईव्ही चा नवीन लोगो तयार केला आहे. या लोगोमध्ये एक वर्तुळ किंवा आवर्तन दाखवलं आहे. ज्यातून कंपनीला आपली गती आणि प्रगती दाखवायची आहे. याचबरोबर नवीन ब्रँडमुळे टाटा मोटर्सने नवीन रंगसंगती स्वीकारली आहे. आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी ऑडिओ संदेशही बदलण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Death Certificate : स्मशानात अंत्यविधीनंतर मिळणार मृत्यू प्रमाणपत्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

टाटा मोटर्स कंपनीचा देशातील इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांमधील बाजार हिस्सा जवळ जवळ ७० टक्के इतका आहे. त्यामुळे बाजारातील आपलं प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी कंपनी आता सरसावली आहे. सध्या कंपनी टियागो ईव्ही, टिगॉर ईव्ही आणि निक्सॉन ईव्ही अशा तीन इलेक्ट्रिक गाड्या विकते. आणि एका वर्षात १ लाखांच्यावर इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही कंपनीने साध्य केली आहे.

आता येणाऱ्या महिन्यांमध्ये कंपनीला आपल्या आणखी चार गाड्‌यांना इलेक्ट्रिक प्रकारात लाँच करायंचय. या गाड्या असतील पंच ईव्ही, हॅरियर ईव्ही, कर्व्ह ईव्ही. यापैकी हॅरियर ईव्ही ही गाडी टाटा मोटर्सने अलीकडेच झालेल्या नॉयडातील ऑटो एक्पोमध्ये लोकांसमोर आणली होती. याच कार्यक्रमात कंपनीने कर्व्ह ईव्हीची संकल्पनाही लोकांना सांगितली होती.

काही महिन्यात कंपनी पंच ईव्ही लाँच करेल. ही कंपनीची सर्वात लहान एसयुव्ही असेल. टाटा मोटर्सचे विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख विवेक श्रीवत्स यांनी पत्रकारांशी बोलताना नवीन ब्रँड मागील विचारधारा सांगितली. ‘टाटा.ईव्ही हा नवीन ब्रँड आणण्यामागचा हेतूच हा आहे की, कंपनी ऑटोमोबाईलच्या नवीन काळात प्रवेश करतेय हे लोकांना कळावं. पर्यावरणपूरक इंधनाकडे कंपनीची वाटचाल कशी सुरू आहे, हे लोकांना कळावं. आणि शाश्वत विकास, समाजहित तसंच तंत्रज्जानातील विकास या गोष्टींची कास धरून ऑटोमोबाईल क्षेत्रात बदल घडवण्यासाठी टाटा मोटर्स ईव्ही आता सज्ज आहे, हा विश्वासही आम्हाला लोकांना द्यायचा आहे,’ श्रीवत्स यांनी कंपनीची भूमिका मांडली.

कंपनीचा नवीन ब्रँड लोकांना आपलासा वाटेल, लोकांशी प्रामाणिक असेल आणि जास्त संवादात्मक असेल, असा विश्वास श्रीवत्स यांनी व्यक्त केला. आपला ईव्ही ब्रँड घेऊन टाटा मोटर्सला जागतिक बाजारपेठेतही पाय रोवायचे आहेत. १४ सप्टेंबरला कंपनी निक्सॉन ईव्ही ही आपली जुनी कार नवीन रुपात बाजारात आणणार आहे.

नवीन गाडीचं रुपडं पूर्णपणे बदलण्यात आलं आहे आणि इंजिनातही बदल करण्यात आलेत. या गाडीच्या सध्या चाचण्या सुरू आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.