Talathi Exam : तलाठी परीक्षेमधील भोंगळ कारभार; सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा सुरु होण्यास विलंब

140
Talathi Exam : तलाठी परीक्षेमधील भोंगळ कारभार; सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा सुरु होण्यास विलंब

सध्या राज्यात तलाठी भरतीसाठीच्या (Talathi Exam) परीक्षा सुरु आहेत. मात्र या परीक्षेमधील गोंधळ दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आज (२१ ऑगस्ट, सोमवार) पुन्हा या परीक्षेमध्ये गोंधळ निर्माण झाला. आजच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसमोर सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं होतं. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती.

परीक्षा केंद्रांवर (Talathi Exam) मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झालेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही परीक्षा होती. मात्र अजूनही परीक्षा सुरू होऊ शकलेली नाही.

(हेही वाचा – Examinations : गणेशोत्सव काळात मुलांच्या परीक्षा नको, पालकांची शिक्षण विभागाकडे मागणी)

महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या (Talathi Exam) ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेच्या शुल्कावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील तलाठी भरती पेपरचा खोळंबा

अकोला जिल्ह्यातील दोन्ही परिक्षा (Talathi Exam) केंद्रावर सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे. जिल्ह्यात बाभूळगाव आणि कापशी येथे दोन परिक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा होती. सकाळी ९ ते ११ ही परीक्षेचे वेळ होती. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी खोळंबली.

नागपूरमध्येही तलाठी परीक्षेचं सर्व्हर डाऊन

नागपूरसह जवळपास सर्वच केंद्रांवर ही परीक्षा (Talathi Exam) सुरू झालेली नाही. नागपूरच्या व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश पत्र हातात घेऊन उभे आहेत. मात्र त्यांना वर्ग खोल्यांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. काही ठिकाणी परीक्षार्थ्यांनी परीक्षेची व्यवस्था आणि सर्वर डाऊन झाल्याबद्दल रोष व्यक्त केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.