वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींवर कारवाई करा; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच’ची मागणी

124

राष्ट्रपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बेताल वक्‍तव्य करून त्यांचा अवमान करणाऱ्या कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागपूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचने केली आहे. तसे पत्र त्यांनी मंगळवार, २८ मार्च रोजी नागपूरच्या कपील नगर पोलीस ठाण्यात दिले आहे.

क्रांतिकारांचे मेरूमणी असणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कॉंग्रेसचे राहुल गांधी हे बेताल वक्तव्य करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने आयुष्य पणाला लावले, तुरुंगवास भोगला, यातना सहन केल्या त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करून त्यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींवर कारवाई करावी अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचने पोलिसांकडे केली आहे.

राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील अवमानकारक विधानांना न रोखता, त्यांना न थांबवता ‘मौनं सर्वार्थ साधनम’ या पद्धतीने राजकीय हेतु साध्य करू पाहणारे काँग्रेस पक्षाचे तसेच अन्य विचारसरणींचे कुहेतु असणारे राजकीय गट, पक्ष, संघटना, व्यक्ती यांचाही शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

… तर तीव्र आंदोलन केले जाईल!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींवर लगेच कारवाई व्हायला हवी जेणेकरून यानंतर राष्ट्रपुरुषांविरोधांत अशा प्रकारची विधाने करण्याची कोणाची हिंमत होणार नाही असा उल्लेख पत्रात करत या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचने म्हटले आहे. संस्थेचे अध्यक्ष मनोज शाहू, सचिव अरूणपालसिंह बेहल आणि उपाध्यक्ष ओमप्रकाश शाहू तसेच संस्थेचे अखिल खापेकर, निलेश खापेकर, मयूर चिमुरकर, आशीम खान, अरविंद भंडारी, अनुराग लारोकर, राहुल काळे, सुमित वेध, अंकुश मडके यांनी हे निवेदन पोलिसांना दिले आहे. या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठवण्यात आली आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसच्या शिदोरी मासिकावर कारवाई करावी – रणजित सावरकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.