Swatantra Veer Savarkar Film : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या पायरसीचा धोका ‘हिंदुस्थान पोस्ट’ने हाणून पाडला

रणजित सावरकर यांनी सावरकर प्रेमी आणि देशप्रेमींनी आवाहन केले आहे की, 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट सिनेमागृहातच जाऊन बघावा, तसेच सोशल मीडियावर आलेली चित्रपटाची लिंक अथवा पायरेटेड कॉपी पाहू नये.

153

एखादा चित्रपट प्रदर्शित होताच ऑनलाइन व्हिडिओ पायरसी करून सोशल मीडियावर त्याची लिंक पाठविण्याचे बेकायदेशीर कृत्य भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे सर्वात अधिक आर्थिक नुकसान चित्रपट निर्मात्यांचे होत असते. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Film) या चित्रपटाची बेकायदेशीररित्या कॉपी करून हा चित्रपट सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे बेकायदेशीर कृत्य नुकतेच ‘हिंदुस्थान पोस्ट’ने हाणून पाडले आहे. या प्रकरणी ‘हिंदुस्थान पोस्ट’कडून ‘अँटी पायरसी सेल’कडे तक्रार दाखल करण्यात आली असून अँटी पायरसी सेलकडून या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे.

‘शासनाने कठोर कारवाई करावी’ 

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Film) हा चित्रपट पाडण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केला जात असून शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाची लिंक अथवा पूर्ण चित्रपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लाखो, करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात येणारे चित्रपट सिनेमागृहात चालत नसल्यामुळे याचा सर्वात अधिक फटका चित्रपट निर्माते आणि सिनेमागृह मालकाला बसत आहे. चित्रपट पायरसीवाले चित्रपटांची बेकायदेशीर कॉपी करून त्याची लिंक सोशल मीडियावर व्हायरल करतात. चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचे बेकायदेशीररित्या व्हिडीओ शूटिंग करून त्याचे एडिटिंग करून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रमाण वाढत आहे.

(हेही वाचा Veer Savarkar Premiere Show : देशाच्या विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांना उजाळा मिळेल, प्रीमियर शोनिमित्त अभिनेते रणदीप हुड्डाने साधला प्रेक्षकांशी संवाद)

जाणीवपूर्वक पायरसीचा प्रयत्न ! 

या पायरसीचा फटका ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला (Swatantra Veer Savarkar Film) देखील बसला आहे, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट बघण्यासाठी सावरकरप्रेमी तसेच देशप्रेमींनी चित्रपटगृहावर एकच गर्दी केली आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघून पायरसीवाल्यांनी या चित्रपटाची बेकायदेशीररीत्या कॉपी करून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा जाणीवपूर्वक प्रकार सुरू केला.

सावरकरप्रेमी आणि देशप्रेमींनी चित्रपटाची पायरसी रोखावी – रणजित सावरकर 

हा प्रकार ‘हिंदुस्थान पोस्ट’ने उघडकीस आणून याची कल्पना चित्रपटाचे निर्माते हुड्डा यांच्या कार्यालयाशी संबंधित व्यक्तीला दिली. त्याच बरोबर अँटी पायरसी सेलला या व्हायरल चित्रपटाची पायरेटेड कॉपी पाठवून त्यांना याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’कडून माहिती देण्यात आली. अँटी पायरसी सेलने याची दखल घेत कारवाई सुरू केली. स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट चालू न देणे, या चित्रपटाला (Swatantra Veer Savarkar Film) सिनेमागृहात मिळणारा प्रतिसाद कमी करून निर्माते आणि सिनेमागृह मालकांना आर्थिक नुकसान करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केला जात असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना सांगितले. रणजित सावरकर यांनी सावरकरप्रेमी आणि देशप्रेमींनी आवाहन केले आहे की, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट सिनेमागृहातच जाऊन बघावा तसेच सोशल मीडियावर आलेली चित्रपटाची लिंक अथवा पायरेटेड कॉपी पाहू नये, तर यासंबंधी स्थानिक पोलीस ठाणे अथवा अँटी पायरसी सेलकडे तक्रार नोंदवून जाणीवपूर्वक असे प्रकार करणाऱ्यांचे मनसुबे हाणून पाडावे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.