अक्षय्य तृतीया या पवित्र आणि शुभ मानल्या जाणाऱ्या सणाच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. परंतु, याच मुहूर्तावर अनेक ठिकाणी बालविवाह (Child Marriage) होण्याचे प्रकारही समोर येतात. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे राज्यात एकूण २६ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
महिला बालविकास विभागाची बैठक; दूरदृश्य प्रणालीद्वारे अधिकारी सहभागी
बालविवाह (Child Marriage) रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि समन्वयाबाबत “निर्मल भवन” येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध जिल्ह्यांतील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले. बैठकीत बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला.
(हेही वाचा – “भारत हा अब्जावधी कथांचा देश” ; Waves 2025 समिटमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य)
बालविवाह रोखण्यासाठी ठोस कार्यवाही
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील भोकर शहर आणि मुखेड तालुक्यातील मंगनाळी या गावात होणारे दोन बालविवाह (Child Marriage) वेळेत हस्तक्षेप करून रोखण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक पातळीवर जनजागृती झाली असून, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश गेला आहे.
बालविवाहमुक्त महाराष्ट्राची संकल्प
राज्यातील विविध भागांतून आलेल्या अहवालांनुसार, फक्त एका दिवसात २६ बालविवाह (Child Marriage) रोखण्यात आले. यामुळे महिला व बालविकास विभागाच्या प्रयत्नांचे फलित स्पष्ट झाले आहे. याबाबत बोलताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, “बालविवाहमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहेत.”
(हेही वाचा – Yuzvendra Chahal ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज)
सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्नांची गरज
बालविवाह (Child Marriage) ही सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर समस्या असून, तिचे निर्मूलन करण्यासाठी सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने घेतलेली ही ठोस पावले बालकांच्या सुरक्षित भविष्याकडे उचललेले सकारात्मक पाऊल ठरू शकतात असे यावेळी बोर्डीकर म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community