Mumbai Metro: मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची कनेक्टिव्हिटी आणखी सुलभ होणार; ‘हा’ घेतला निर्णय

14

देशाची आर्थिक राजधानी आणि वेगाने विकासाच्या नवनव्या कक्षा पादाक्रांत करणारे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत मेट्रोचे (Mumbai Metro) नवीन मार्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे साहजिकच मुंबईकरांच्या प्रवासाची गती वाढेल. मात्र, या मेट्रो स्थानकांपर्यंत किंवा तिथून इच्छितस्थळी पोहचण्याच्या प्रवासात अनेक अडथळे आहेत. यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरण अर्थात MMRTA ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘एमएमआरटीए’ने मुंबई उपनगरातील २८ मेट्रो स्थानकांबाहेर शेअरिंग रिक्षा आणि शेअरिंग टॅक्सी स्टँड उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा मेट्रो स्थानकांपर्यंतचा आणि तिथून इच्छित स्थळापर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे.

सुरुवातीला सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर याठिकाणी शेअरिंग रिक्षा आणि टॅक्सी सेवा सुरु करण्यात येईल. शेअरिंग रिक्षा आणि टॅक्सी चालकांची झुंबड उडाल्यास संबंधित मेट्रो रेल्वेच्या (Mumbai Metro) स्थानकांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे ‘एमएमआरटीए’ने सुरुवातीला हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे ठरवले आहे. मेट्रो स्थानकांबाहेर शेअरिंग रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय कितपत व्यवहार्य ठरु शकतो, हे आम्ही तपासून पाहू. त्यानंतर संबंधित परिसरात शेअरिंग रिक्षा, टॅक्सीमुळे वाहतुकीची समस्या उद्भवणार नसेल तर आम्ही मेट्रो स्थानकांच्या परिसरात रिक्षा आणि टॅक्सी स्टँड सुरु करण्याची परवानगी देऊ, अशी माहिती ‘एमएमआरटीए’च्या एका अधिकाऱ्याने दिली.

(हेही वाचा Western Railway : ऐन गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेचा खोळंबा; तब्बल 22 गाड्या केल्या रद्द)

प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणाऱ्या या रिक्षा आणि टॅक्सी स्टँडसाठी ‘एमएमआरटीए’ने २८ मेट्रो स्थानके निश्चित केली आहेत. यापैकी काही मेट्रो स्थानकांसाठी एक तर जास्त रहदारी असलेल्या मेट्रो स्थानकांसाठी रिक्षा आणि टॅक्सीचे तीन मार्ग निश्चित करण्यात येतील. लवकरच ‘एमएमआरटीए’कडून ४० पेक्षा अधिक शेअर रिक्षा-टॅक्सी मार्गांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ही ठिकाणे शक्यतो मेट्रो स्थानकांपासून जवळ असणारी कार्यालयीन ठिकाणे किंवा जास्त लोकसंख्येच्या रहिवाशी वस्त्या असतील. वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो मार्गावरील आठ स्थानकांबाहेर ही सेवा सुरु करण्यात येईल. याशिवाय, अंधेरी पश्चिम ते दहिसह या मेट्रो-२अ च्या मार्गावर, तसेच गुंदवली ते दहिसर या मेट्रो मार्गावरील स्थानकांबाहेरही शेअरिंग रिक्षा-टॅक्सीची सेवा सुरु करण्यात येईल.

कोणत्या मेट्रो स्थानकांबाहेर शेअरिंग रिक्षा-टॅक्सी स्टँड सुरु होणार?

वर्सोवा, डी.एन. नगर, अंधेरी, चकाला, गोरेगाव, आरे, दिंडोशी, आकुर्ली, पोयसर, मागाठणे, कांदिवली, डहाणूकरवाडी, ओवारीपाडा, दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदारपाडा , मालाड पश्चिम, राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली, शिंपोली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.