होम क्वारंटाइन रुग्णांसाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्या! भाजपाची महापालिकेकडे मागणी 

नजीकच्या खासगी डॉक्टरांच्या मदतीने कोविड रुग्णावर देखरेख ठेवल्यास रुग्णाला मोठा मानसिक आधार मिळेल, असे नगरसेविका सारिका मंगेश पवार यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

72
मुंबईतील सध्या आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे घरात राहूनच उपचार घेत आहेत. परंतु घरात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णाला आज वैद्यकीय सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे मुंबईत घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी विभागातील खासगी डॉक्टरांची मदत घेतली जावी, अशी मागणी भाजपने केली आहे. विभागातील खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून घरात उपचार घेणाऱ्या या रुग्णाला मार्गदर्शन केल्यास त्यांना आधार मिळून त्यांची प्रकृती खालावण्याचे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या माध्यमातून मार्गदर्शक धोरणे तयार करावे!

भाजपच्या भांडुप- कंजूरमार्ग येथील नगरसेविका सारिका मंगेश पवार यांनी यासंदर्भात महापलिका आयुक्त इक्बालसिंह  चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना निवेदन देत ही मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी, घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरता मार्गदर्शन करण्यासाठी विभागातील खासगी डॉक्टर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी. या खासगी डॉक्टरांना विभागातील घरीच राहून उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय मार्गदर्शन करण्याबाबत महापालिकेच्या माध्यमातून मार्गदर्शक धोरणे तयार करावी. जेणेकरून खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णाला मानसिक धीर देता येईल आणि घाबरून ज्या रुग्णांची प्रकृती खालावते, ते प्रमाण कमी होईल. तसेच महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवरील बराच ताण कमी होईल आणि त्यांना इतर आरोग्य यंत्रणेकडे तसेच इतर व्यवस्थेकडे लक्ष देता येईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

(हेही वाचा : आरोग्य समिती अध्यक्षपदी राजुल पटेल!)

घरी उपचार घेणारे रुग्ण निराधार!

मुंबईसह राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही त्याप्रमाणे वाढत आहे. मात्र, या आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांपैकी ८० ते ८२ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले असून एकूण बाधित रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे घरीच विलगीकरणात राहून स्वतःचे उपचार घेत आहे. अश्या प्रकारे घरीच विलगीकरणात राहिलेल्या रुग्णांची महापालिकेच्या विभागीय वॉर रूममधून चौकशी केली जाते. तर काही रुग्णांचे फॅमिल फिजिशियन असल्याने ते त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत असतात. तसेच आवश्यक असल्यास रुग्णालयात दाखल होतात. जे रुग्ण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच राहून उपचार घेतात, त्यांना या डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला मिळत असल्याने एकप्रकारे आधार मिळतो. पण असे अनेक रुग्ण आहेत, जे घरीच राहून उपचार घेतात, पण त्यांचे कोणी फॅमिली फिजिशियन नाही. त्यामुळे विभागीय वॉर रूममधून जे विचारले जाईल, तेवढाच त्यांचा संपर्क आणि त्यांच्या संवाद असतो. बाकी उपचाराबद्दल रुग्ण अनभिज्ञ असतो. त्यामुळे अनेक रुग्ण घाबरून जातात. परिणामी त्यांची प्रकृती खालावते.

…तर रुग्णाला मोठा मानसिक आधार मिळेल!

अशा परिस्थितीत मग त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे अशा परिस्थिती जर त्यांना नजीकच्या खासगी डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्यावर देखरेख ठेवली किंबहुना ते डॉक्टर संबंधित रुग्णाच्या संपर्कात राहिला आणि त्यांना उपचाराबाबत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवरून मार्गदर्शन केल्यास त्या रुग्णाला मोठा मानसिक आधार मिळेल, असे म्हटले आहे. त्यामुळे या कामाकरता महापालिकेने त्या खासगी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, जेणेकरून खासगी डॉक्टरांना ही रुग्ण सेवा करताना त्यांना त्याचा मोबदला मिळेल व ते मन लावून या कामात झोकून देतील, अशीही सूचना केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.