Deepak Kesarkar : महापालिकेच्या ‘त्या’ १५५ शाळांच्या मुख्याध्यापकांचा शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मान

दादर (पूर्व) येथील लोकमान्य टिळक कॉलनी परिसरातील योगी सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.

195
Deepak Kesarkar : महापालिकेच्या 'त्या' १५५ शाळांच्या मुख्याध्यापकांचा शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मान
Deepak Kesarkar : महापालिकेच्या 'त्या' १५५ शाळांच्या मुख्याध्यापकांचा शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मान

माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात उत्तम कामगिरी करणाऱ्या शाळांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पारितोषिक जाहीर करण्यात आले आहेत. महापालिकेच्या एकूण १५५ शाळांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांचा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सन्मान करण्यात आला. दादर (पूर्व) येथील लोकमान्य टिळक कॉलनी परिसरातील योगी सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान शहराचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महापालिकेच्या शाळांमध्ये २०२३ च्या शालांत परीक्षेत ९५-१०० टक्के निकाल लागलेल्या ७३ शाळांना प्रत्येकी २५ हजार रुपये, ९० ते ९४.९९ टक्के निकाल लागलेल्या ३८ शाळांना प्रत्येकी २० हजार रुपये, ८५ ते ८९.९९ टक्के निकाल लागलेल्या ४४ शाळांना प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि शब्दकोश असे या पारितोषिकाचे स्वरुप होते.

याप्रसंगी बोलतांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले, शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून शासन काम करत आहे. आगामी वर्षात मुंबईतील सर्व शाळा अद्ययावत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. राज्य शासन राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुमारे १ लाख ४२ हजार कोटी रुपये खर्च करते. त्यातील सुमारे ६२ हजार कोटी रुपये केवळ शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात यावरुन या क्षेत्राचे महत्व आपण लक्षात घ्यायला हवे. शालेय शिक्षण अधिक दर्जेदार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

(हेही वाचा – One Nation One Election : मोदी सरकार One Nation One Election विधेयक आणणार ?)

त्यामध्ये विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तके, वह्या, गणवेश आणि बूट उपलब्ध करून दिले जात आहेत. पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांवर मानसिक ओझेही राहू नये यासाठी पेडियाट्रीक्स असोसिएशन ऑफ इंडियासोबत मिळून धोरण बनवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. २५ हजार विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षण आणि रोजगार मिळावे यासाठी हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससोबत मिळून उपक्रम राबविला जात आहे. शालेय मुलांना व्यवसायिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षीपासून स्काऊट गाईड अनिवार्य करण्यात येईल. याशिवाय, यावर्षी राज्यात सुमारे ५० हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

जगभरातील लोक भारताकडे आशेचे केंद्र म्हणून बघत आहे. म्हणून येथील विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन प्रगती साधायला हवी, अशी भावनाही केसरकर यांनी या वेळी व्यक्त केली. आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले की, आपण १९५९-६० मध्ये महानगरपालिका शाळेत शिकलो आहे. तेव्हा शिक्षणाच्या खूप अडचणी होत्या. पण आज महानगरपालिकेच्या शाळा उत्तम पद्धतीने काम करत आहेत. आगामी काळात येथील विद्यार्थी राज्यातून पहिला यायला हवा, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, पुढील वर्षी १५० पेक्षा अधिक शाळांचा निकाल हा ८५ टक्क्यांहून अधिक लागेल, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल, असा आशावाद सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.