डॉक्टरांवर हल्ला करणारा रुग्ण मानसिक आजाराचा बळी ? कडक शिक्षेच्या मागणीसाठी डॉक्टर्स बेमुदत संपावर

117

यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांवर हल्ला करणा-या सूरज ठाकूर (३६) हा रुग्ण मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. सूरजला पोलिसांनी रुग्णालयातून रात्रीच अटक केली. त्याची मानसिक चाचणी केली जाणार आहे. आरोपीवर कडक कारवाई करा तोपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयातील मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने घेतली आहे. सूरज ठाकूरने स्वतःवरच हल्ला केल्याने बुधवारी त्याला यवतमाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो व्यसनीही होता.

शुक्रवार सकाळपासून या घटनेचा निषेध देशभरातील तसेच राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदवला. सूरज याने डॉक्टर जेबेस्टीन एडविन या निवासी डॉक्टराच्या गळ्यावर तसेच पाठीवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी डॉक्टर जेबेस्टीन यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टर एडविन यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती यवतमाळ मार्डकडून दिली गेली. यवतमाळ येथे याआधीही डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. श्री वसंतराव नाईक सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी देण्याच्या हालचाली होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असे सांगत डॉक्टरांनी शुक्रवारपासून रस्त्यावर मोर्चे काढले. संपामध्ये इंटर्न्स, एमबीबीएस, बीपीएमटी विद्यार्थ्यांनाही सहभाग घेतला आहे. डॉक्टरांनी रस्त्यावर मोर्चे काढत रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांविरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला.

यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयातील हल्ल्याच्या घटना –

  • १० जानेवारी २०२१ – रुग्णालय परिसरात डॉ अशोक पाल यांची मारेक-यांकडून निर्घुण हत्या
  •  ६ डिसेंबर २०२२ – अपघात विभागात रुग्णाच्या नातेवाईकांध्ये शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत होत एकाने दुस-यावर चाकूने हल्ला केला.यवतमाळ मार्डच्या मागण्या –
  • आरोपीविरोधात पोलिसांनी कलम ३०७ लावून कारवाई करावी
  • सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस चौकी उभारली जावी. पोलिस चौकीत एक पोलिस उपनिरीक्षक, दोन हवालदार आणि चार पोलिस शिपाई असावेत. यात दोन महिला पोलिसांचाही समावेश असावा.
  • रुग्णालयातील प्रत्येक विभागात महाराष्ट्र सुरक्षा बल रक्षकाची नेमणूक केली जावी.
  • रुग्णालयाच्या दरवाज्यावर रुग्णाची तपासणी करण्यासाठी मॅटल डिटेक्टर तसेच बॅगच्या तपासणीसाठी आवश्यक साधने असावी
  •  रुग्णालयात आपत्कालीन अलार्म सेवा उपलब्ध केली जावी
  •  रुग्णासोबत एकाच नातेवाईकाला रुग्णालयात प्रवेश दिला जावा. नातेवाईकांना प्रवेशिका पास दिला जावा.
  • रुग्णालयाचे मुख्यप्रवेशद्वार तसेच अपघात विभागाजवळ सशस्त्र सुरक्षारक्षक असावेत. सुरक्षारक्षकांना घातपाताप्रसंगी शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली जावी.
  •  रुग्णालय परिसरात तसेच रुग्णालयात पोलिस तसेच सुरक्षारक्षकांनी दिवसभरातून पाचवेळा टेहाळणी करावी
  •  रुग्णालयात बाहेरच्या घटकांचा हस्तक्षेप नको
  •  बाहेरील गटांसाठी वाहनतळ मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा रुग्णालयाबाहेर दिले जावे
  •  सर्व डॉक्टरांना सुरक्षा देता येत नसेल तर डॉक्टरांना दुस-या रुग्णालयात दाखल करा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.