बाजारातील मासळी सोबत दुर्गंधी मोफत…ऑनलाईन मासळी विक्रेत्यांच्या जाहिराती

ऑनलाइन मासळी विक्री करणाऱ्या लिसीयस या कंपनीकडून जाहिरात प्रदर्शित झाली आहे.

101

आधी मासे बाजारांवर कारवाई करून कोळी भगिनींच्या पारंपरिक व्यवसायावर गदा आणली जात असतानाच ऑनलाइन मासे खरेदीच्या माध्यमातून रस्त्यावर विक्री करणाऱ्या कोळी महिलांना हद्दपार करण्याचा डाव रचला जात आहे.  या ऑनलाइन मासे विक्री करणाऱ्या कंपन्या कोळी भगिनींना बदनाम करत बाजारातील मासे कसे दुर्गंधीयुक्त आहेत, अशी वातावरणनिर्मिती करत आहेत. ऑनलाईन मत्स्य विक्री करणाऱ्या ‘लिसीयस’ कंपनीने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये ‘मच्छी के साथ बदबू फ्री’ असे सांगत  बाजारातील माशांना वास येत असून आपल्याकडील माशांना दुर्गंधी येत नसल्याचा प्रचार सुरू केला आहे. याला आता मच्छीमार कृती समितीने आक्षेप घेत ही जाहिरता त्वरित दाखवणे बंद करावे, अशी कायदेशीर नोटीस देत अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

कोळी महिलांना येथून हद्दपार केले!

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोळी बांधवांचा विषय जोरात गाजतोय. मुंबईतील घाऊक आणि किरकोळ मासळी बाजार असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) जवळील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक झाल्याने ते बांधकाम तोडून टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यामुळे येथील घाऊक व किरकोळ मासे विक्री करणाऱ्यांना ऐरोली तेथे पाठवण्यात आले आहे. या विरोधात कोळी महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र असे असतानाच दादर पश्चिम येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे मासळी बाजाराची जागा तोडून तेथील मासे विक्री करणाऱ्यांना हटवण्यात आले आहे. गोड्या पाण्यातील मासळी विक्रीला येथील लोकांचा विरोध असला तरी याठिकाणी जे १० ते १५ कोळी महिला समुद्रातील मासळी विकत होता, त्यांना कुणाचाही विरोध नव्हता. पण या कोळी महिलांना येथून हद्दपार केले असून त्यांना याच भागातील मासळी बाजारात सामावून घेण्याची मागणी होत आहे. एक घाऊक आणि किरकोळ मासळी बाजारांवर कारवाई होत असतानाच टीव्ही आणि युट्यूब वर ऑनलाइन मासळी विक्रीच्या जाहिराती प्रदर्शित होऊ लागल्या आहेत.

(हेही वाचा : मुंबईत मोबाईल चोरांची टोळी! ‘कौआ’, ‘मशीन’ आणि ‘कंपनी’ कोडवर्ड!)

अशी आहे जाहिरात!   

याबाबत कोळी महिलांमधून संताप व्यक्त होत असतानाच ऑनलाइन मासळी विक्री करणाऱ्या लिसीयस या कंपनीची एक जाहिरात प्रदर्शित झाली आहे. ज्यामध्ये एक पुरुष बाजारातून मासळी विकत घेत पिशवीतून घेत जात असतो. ही व्यक्ती मासळी घेऊन जात असताना रस्त्यावरून चालताना आणि बसमधून जाताना लोक आणि प्रवाशी त्या माशांच्या दुर्गंधीने पळून जातात.’ तू आगे, मै तेरे पिछे पिछे’, असे गाणे लागते. तर घरी हे मासे आणल्यानंतर त्याची बायको नाकाला हात लावत दरवाजाच लावून घेते. त्यानंतर ‘बाजार वाली मच्छी के साथ बदबू फ्री’ असे बोलतात…ट्राय लिसीयस असे ऑनलाइन मासे खरेदी करण्याचे आवाहन केले जाते.

कंपनीला मच्छिमार कायदेशीर नोटीस !

या जाहिरातीबाबत तीव्र संताप कोळी भगिनींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या लिसीयस या कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून तात्काळ ही जाहिरात दाखवणे बंद करावी, असे कळवले आहे. मच्छीमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवून जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे. मासेमारी आणि मच्छी विक्री हा कोळी लोकांचा परंपरागत व्यवसाय असून आजवर ही मासळी बाजारात विकली जात असताना त्याचा वास कधी आला नाही.आता ही ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्यापासून बाजारातील मासळीला बदनाम केले जाते. यामध्ये कोळी समाज आणि कोळी महिला यांची बदनामी होत असून हे आम्ही सहन करणार नाही. या कंपनीला आम्ही ही जाहिरात त्वरित दाखवणे  बंद करावे याबाबत नोटीस पाठवून अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचाही इशारा दिला आहे. आधी मार्केटवर कारवाई, आता ही ऑनलाइन मासे विक्री आणि त्यातून होणारी बदनामी ही एक प्रकारे कोळी महिलांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान आहे. त्यामुळे याची सरकारने दखल घेऊन ऑनलाइन मासे विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणीही नयना पाटील यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.