आरेत दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला करणारा बिबट्या होणार जेरबंद

135

आरेत युनिट क्रमांक १५ येथे बिबट्याच्या हल्ल्यात इतिका लोट या दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर बिबट्याला जेरंबद करण्याची मागणी सुरु झाली आहे. लोकांचा वाढता रोष लक्षात घेता सायंकाळीच बिबट्याला पकडण्यासाठी आरेत पिंजरा आणला गेला. मंगळवारी अजून एक पिंजरा परिसरात लावला जाणार आहे. हल्लेखोर बिबट्या हा नर बिबट्या असून, पू्र्ण वाढ झालेला बिबट्या असल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या वर्षांत पहिल्यांदाच बिबट्याच्या झालेल्या हल्ल्यात लहान मुलीचा जीव गेल्याने बिबट्याला पकडण्यासाठी राजकीय पातळीवर वनविभागावर दबाव आणला जात असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्याने इतिकाला शंभर मीटरपर्यंत ओढत नेले. मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान इतिकाचा मृत्यू झाला. दुपारीच लोट कुटुंबीयांनी इतिकाचे अंत्यसंस्कार केले. गेले बरेच महिने आरेत माणसांवर हल्ला कऱणारी सी-३२ ही हल्लेखोर मादी बिबट्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वनाधिका-यांनी जेरबंद केली होती. त्याघटनेच्या वर्षभरानंतर लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. घटनेची गांभीर्यता लक्षात घेत दुपारीच वनविभागाने आरेत ठिकठिकाणी १२ कॅमेरे लावले आहेत. या कॅमे-यात बिबट्याच्या हालचाली आढळून आल्यानंतर शरीरावरील रॉझेट पॅटर्नवरुन बिबट्याची ओळख पटू शकते.

सावधानता म्हणून दिवाळीनिमित्ताने आरेत फटाके फोडण्यासाठी लहान मुलांना सायंकाळी तसेच सकाळच्या प्रहारात घराबाहेर सोडू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वनविभागाने सोमवारपासून आरेतील विविध आदिवासी पाड्यांत बिबट्याच्या अधिवास क्षेत्रात घ्यायच्या आवश्यक काळजींबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. हा जनजागृती कार्यक्रम अजून काही दिवस सुरु राहणार आहे.

हल्लेखोर बिबट्याला जेरबंद केले जाणार आहे. त्यासाठी वनाधिकारी प्रयत्नशील आहेत. माहिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) वनविभाग

( हेही वाचा: चंद्रपूरात माणसावर हल्ला केलेल्या वाघाबाबत समोर आली मोठी माहिती )

बिबट्याच्या अधिवास क्षेत्रात काय काळजी घ्याल ?

  •  रात्री तसेच पहाटे बिबट्याच्या संचाराच्यावेळी घराबाहेर पडू नका
  • आपत्कालीन कामानिमित्ताने घराबाहेर जायचे असल्यास एकट्याने घराबाहेर पडू नका. गर्दीने घराबाहेर पडा.
  • चालत असतानाच मोठ्याने आवाज करत किंवा मोबाईलवर गाणे वाजवा. हातात टॉर्चही असू दे.
  • हातात एक काठीही बाळगा.
  • परिसरातील कच-याचे योग्य पद्धतीने विघटन आणि व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. कच-यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते.
  • कुत्रा हे बिबट्याचे आवडते आणि सहज मिळणारे भक्ष्य आहे. त्यामुळे बिबट्या कुत्र्याला खाण्यासाठी नागरी वसाहतीजवळ येत असल्याचे वनविभागाच्या अभ्यासाअंती दिसून आले आहे.
  • परिसरात प्रसाधनांची संख्या पुरेशी असावी. माणसे प्रातःविधीसाठी जंगलात जातात. डोळ्याला समांतर दिसणारे आपले भक्ष्य असल्याचा बिबट्याचा समज होतो. त्यातून बिबट्या नैसर्गिक विधीसाठी जंगलात गेलेल्या माणसांवर तसेच लहान मुलांवर हल्ला करतो. मात्र बिबट्या माणसाला खात नसल्याचेही विविध घटनांमध्ये आढळून आले आहे.
  • परिसरात वीजेच्या खांबांचीही पुरेशी सोय असावी.
  • बिबट्याचा नागरी वसाहतीजवळ वावर वाढत असल्यास वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाईवर फोन करुन याबाबतची माहिती द्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.