Chiplun Flyover : चिपळूणकर धास्तावले; बहादूरशेखजवळील नवीन उड्डाणपूल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला

पुलाचे बांधकाम सुरू असूनही धोका निर्माण झाला होता

157
Chiplun Flyover : चिपळूणकर धास्तावले; बहादूरशेखजवळील नवीन उड्डाणपूल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला
Chiplun Flyover : चिपळूणकर धास्तावले; बहादूरशेखजवळील नवीन उड्डाणपूल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला

चिपळूणमधील बहादूरशेख नाका (bahadurshek Naka) येथील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) उड्डाणपुलाचा (Chiplun Flyover) काही भाग कोसळला. या फ्लायओव्हरला आधीच तडे गेले होते. आज सकाळी ८ वाजता हा पूल मधोमध खचला होता, मात्र दुपारी २.४५ वाजता हा पूल लॉंचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. (collapsed) यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. गर्डरमधील स्टीलसह पुलाचे कॉंक्रीटदेखील तुटले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मुंबईतील अभियंता पथकाला बोलावण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल होत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सर्वात मोठा उड्डाणपूल असून या पुलाची लांबी १.८१ किमी आहे. यासाठी ४६ खांब उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या पिलर्सचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील बहादूरशेख नाका येथून पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू होते, मात्र नव्याने चढवलेले गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता काम सुरू असतानाच खचले यावेळी मोठा आवाज झाला.

(हेही पहा – Ambedkar Statue in USA : देशाबाहेरचा बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा अमेरिकेत विराजमान )

गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणमध्ये बहादूरशेख नाका येथे असलेल्या या पुलाला तडे गेले होते. या पुलाचं काम अनेक महिन्यांपासून सुरू होतं. याआधी गर्डरमुळे महामार्गावर धोका निर्माण झाला होता. सध्या या पुलाचे काम सुरू असून पुलाच्या आतील सळ्या दिसू लागल्या होत्या. त्यामुळे पुलाचे बांधकाम सुरू असूनही धोका निर्माण झाला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना कैद झाली होती. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच बहादूर शेख नाक्यावर प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली.

या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असून दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे जागोजागी पोलीस बंदोबस्तही तैनात करून हळूहळू वाहने सोडली जात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.