-
ऋजुता लुकतुके
काश्मीरमध्ये पहलगामला निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक कारवाईचे संकेत दिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधू करार रद्द करून पाकिस्तानचं पाणी अडवण्याची घोषणा भारताने केली आहे. याचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. तिथले दोन शेअर बाजार मोठे आहेत. पाकिस्तान एक्सचेंज आणि कराची स्टॉक एक्सचेंज. या दोन्ही शेअर बाजारात गेले दोन दिवस पडझड झाली आहे. यात कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक दोन दिवसांत २,५०० अंशांनी पडला आहे. पण, विशेष म्हणजे लगेचच हा निर्देशांक सावरून पुन्हा १,१४,७९६ वर पोहोचला आहे. (Pak Share Market Crash)
एकीकडे पाकिस्तानची अवस्था अशी आहे की, दर ५ वर्षांनी त्यांचं कर्ज दुप्पट होतं. देशातील परकीय चलन पार रसातळाला गेलं आहे. तर महागाई दर गगनाला भिडला आहे. देशाला नैसर्गिक समस्यांनी व्यापलं आहे. देशातील राजकीय परिस्थिती नेहमीचीच अनिश्चित आहे. असं असताना पाकिस्तानी शेअर बाजार मात्र मागच्या वर्षभरात ६० टक्क्यांनी वाढले आहेत. अगदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला आयात शुल्क वाढीची धमकी दिलेली असताना जगभरातील बाजार कोसळले. पण, पाकिस्तानी शेअर बाजार तेव्हाही चढेच होते. भारताबरोबरच्या संभाव्य युद्धाचीही तितकीशी भीती पाकिस्तानी शेअर बाजारांना सध्या वाटत नाहीए. असं नेमकं का होतंय, ते आधी समजून घेऊया, (Pak Share Market Crash)
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs RR : सुनील गावस्कर यांची रोबो कुत्रा चंपकबरोबर धमाल)
पाकिस्तानमधील जीडीपी विकासदर सप्टेंबर २०२३ मध्ये ०.६ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. पण, त्यानंतर तो हळू हळू सावरतोय आणि आता २.६ टक्क्यांवर आला आहे. महागाईही हळू हळू आटोक्यात येतेय. तर पाकिस्तानच्या लोकांकडे सध्या रोख पैसे वाढले आहेत आणि ते पैसे लोकांनी विश्वासाने शेअर बाजारात गुंतवले आहेत. देशांतर्गत गुंतवणूक वाढल्यामुळे पाकिस्तानचे शेअर चढतायत हे तर खरंच आहे. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण आहे ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेलं ७ अब्ज अमेरिकन डॉलरचं बेलआऊट पॅकेज. दक्षिण आशियाई देशांना मदतीसाठी नाणेनिधीने जो निधी देऊ केला आहे त्यातून पाकिस्तानला हे पैसे मिळणार आहेत. येत्या ३४ महिन्यांमध्ये टप्प्या टप्प्याने ते मिळत राहणार आहेत. (Pak Share Market Crash)
या बातमीने तर पाकिस्तानच्या शेअर बाजारात जान फुंकली आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या करड्या यादीत गेला, तेव्हा कुठल्या ना कुठल्या मुस्लीम राष्ट्राने पाकिस्तानला तात्पुरतं कर्ज देऊन त्यांची सुटका केली आहे. पण, यातून तात्पुरता प्रश्न सुटला असला तरी पाकिस्तानवर कर्जाची टांगती तलवार कायमच राहणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडत चालल्याचं चित्र असलं तरी जोपर्यंत अशी आर्थिक मदत थांबणार नाही तोपर्यंत पाकिस्तानला खरी झळ बसणार नाही. दहशतवादाला खतपाणी घालण्याची त्यांची सवयही जाणार नाही, अशी चर्चा आता आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत रंगली आहे. भारतानेही नाणेनिधीकडून मिळालेल्या मदतीवर आपला अधिकृत आक्षेप नोंदवला आहे. या पैशातून पाकिस्तानमध्ये दहशतवादाला मदत मिळत असल्याचा भारताचा आरोप आहे. आपली बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची तयारी भारताने चालवली आहे. भारताने आता पाकिस्तानविरुद्ध कारवाईची तयारी चालवली आहे. आणि कोणत्याही प्रकारचं युद्ध झालं तरी ते पाकिस्तानला किती झेपेल हा प्रश्नही तज्ञ व्यक्त करत आहेत. (Pak Share Market Crash)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community