
-
प्रतिनिधी
बडोदा संस्थानाचे महानायक महाराज सयाजीराव गायकवाड (Sayajirao Gaekwad) आणि त्यांचे महाराष्ट्राशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात येणार आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्य पुराभिलेख संचालनालयांदरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत केली.
रहिमतपूर ते बडोदा – ऐतिहासिक नाते पुन्हा उजळणार
सयाजीराव गायकवाड (Sayajirao Gaekwad) यांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री महाराणी जमनाबाई गायकवाड यांचे माहेर सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे होते. प्रतिकूल परिस्थितीतही आदर्श राज्य व राजा घडवणाऱ्या या जमनाबाई राणीसाहेबांचे स्मारक व परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील आराखडा सादर करण्याचे निर्देशही मंत्री शेलार यांनी यावेळी दिले.
(हेही वाचा – BMC : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सर्व पुलांची फेरतपासणी; आयआयटीच्या अहवालानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे केले जाणार काम)
दोन राज्यांतील पुराभिलेखांची देवाणघेवाण
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधील पुराभिलेखांचे आदानप्रदान करणे गरजेचे असल्याचे मत मंत्री शेलार यांनी व्यक्त केले. बडोदा संस्थानाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबी समोर येऊ शकतात. त्यामुळे, गुजरात राज्य पुराभिलेखागार आणि महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
इतिहास नव्या पिढीसमोर
“सयाजीराव गायकवाड (Sayajirao Gaekwad) यांच्या कार्याचा दस्तऐवजीकृत इतिहास नव्या पिढीसमोर यावा आणि दोन राज्यांतील ऐतिहासिक, सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी हा सामंजस्य करार उपयुक्त ठरेल,”असे मंत्री शेलार यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महाराणी जमनाबाई यांच्यासारख्या विस्मृतीत गेलेल्या परंतु प्रभावी स्त्री नेतृत्वाची ओळख नव्या पिढीला होणार आहे. तसेच सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या प्रबुद्ध आणि लोकहितवादी शासकाच्या कार्याचा अभ्यास शैक्षणिक क्षेत्रात व्यापकपणे करता येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
