नाना शंकरशेठ यांच्या स्मारकाच्या बांधकामाला ‘निधी’चा अडथळा

एका बाजुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिवस-रात्र एक केला जात असताना दुसरीकडे शिवसेनेला भागोजी किर आणि लहुजी साळवे या स्मारकाचा विसर पडला आहे.

104

मुंबईचे आद्य शिल्पकार आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी महापालिकेने वडाळ्यात जागा उपलब्ध करून दिली असली तरी प्रत्यक्षात या स्मारकाचे बांधकामच अडकले आहे. नोटबंदी आणि त्यानंतर आलेल्या कोरोनाचे संकट यामुळे देणगीदारांनीच आता पाठ फिरवल्याने नामदार नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहे. त्यामुळे इतर स्मारकांच्या बांधणीमध्ये ज्याप्रमाणे सरकारने सढळ हस्ते मदत केली त्याप्रमाणेच नाना शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी सरकारने मदत करावी यासाठी प्रतिष्ठानचे प्रयत्न सुरु आहेत.

निधीअभावीच या स्मारकाचे बांधकाम अडकले

नाना शंकरशेठ यांचे मुंबईत स्मारक व्हावे यासाठी तत्कालिन शिवसेना नरगसेवक ऍड. मनमोहन  चोणकर यांनी प्रयत्न करत यासाठी महापालिकेकडून  भूखंड प्राप्त करून घेतला. यासाठी महापालिकेने १५०० चौरस मीटरची जागा वडाळ्यात उपलब्ध करून दिल्यानंतर त्या स्मारकाच्या उभारणीचे श्रीफळ वाढवण्यात आले. परंतु त्यानंतर आलेले नोटबंदीचे संकट आणि त्यातून सावरत नाही तोच पुन्हा आलेले कोविडचे संकट यामुळे स्मारकाच्या बांधकामाला खिळ बसली आहे. नाना शंकरशेठ यांचे मुंबईतील कार्य लक्षात घेता त्यांचे स्मारक त्यांच्या प्रतिमेला साजेसे असे प्रशस्त असे बनवण्याचा निर्णय घेतला. परंतु निधीअभावीच या स्मारकाचे बांधकाम अडकले आहे. यासंदर्भात नामदार नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे सरचिटणीस ऍड. मनमोहन चोणकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी स्मारकाचे काम सध्या निधीअभावी संथ गतीने सुरु असल्याचे सांगितले. यासंदर्भात आता शासनाकडे निधीसाठी मागणी केली जाणार आहे. शासनाने आतापर्यंत अनेक स्मारकांना जागेसह उभारणीसाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्याच धर्तीवर नाना शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : आंदोलन करा, पण… शेतकरी संघटनांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)

भागोजी किर आणि लहुजी साळवे यांच्या स्मारकाचा पडला विसर

मुंबई महापालिकेतील सत्तधारी पक्षाच्यावतीने भागोजी किर आणि क्रांतीवीर लहुजी  साळवे यांची स्मारक बांधण्याची घोषणा केली. तीन वर्षांपूर्वी या स्मारकांसाठी  महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीचीही तरतूद करण्यात आली. परंतु एका बाजुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिवस-रात्र एक केला जात असताना दुसरीकडे या दोन्ही स्मारकांचा शिवसेनेला विसर पडलेला आहे.

मुंबई महापालिकेने मागील अनेक वर्षांपासून क्रांतीवीर लहुजी साळवे आणि भागोजी किर यांचे स्मारक बांधण्याचे जाहीर करत स्थायी समितीच्या अधिकारात अर्थसंकल्पात ठोक रकमेची तरतूद केली होती. भागोजी किर हे गाडगे महाराजांना अध्यात्मिक गुरु मानायचे. त्यांच्या सांगण्यानुसार भागोजींनी आळंदीत धर्मशाळा बांधल्या, तिथे यात्रेकरुंसाठी अन्नछत्र सुरु केले. किर यांनी फक्त पैसा उभारला नाही तर सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्येही हाती घेतली. तसेच दादर सारख्या सुसंस्कृत, मोठ्या लोकसंख्येच्या परिसरातील हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही, असे जेव्हा एकदा भागोजी यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सरकारकडे स्वस्त किंवा फुकट भूखंडासाठी अर्ज न करता शिवाजी पार्कला प्रचंड मोठी जागा, त्या वेळच्या बाजार भावाने स्वत:चे पैसे टाकून ती विकत घेतली आणि त्यावर स्मशान उभारले आणि त्यांचे लोकार्पण केले. त्यामुळे त्यांचे हे योगदान पाहून शिवसेनेने त्यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला होता. तर क्रांतीवर लहुजी साळवे यांचेही स्मारक बांधण्याची घोषणा केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.