शहरात सीटबेल्ट सक्ती : प्रत्येक नियम आम्हालाच का? मुंबईकरांचा सवाल, प्रवासी, वाहनचालकांच्या नाराजीचे ‘हे’ आहे कारण!

87
मुंबई शहरात १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेल्या सीटबेल्ट सक्तीमुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. सीटबेल्ट सक्तीमुळे सामान्य प्रवाशांना भुर्दंड पडणार असून टॅक्सी चालकाकडून ४ च्या ऐवजी तीन प्रवासी घेण्यात येणार असल्यामुळे एकाच कुटुंबातील चौथ्याने वेगळी टॅक्सी करायची का? असा प्रश्न सामान्य मुंबईकर विचारत आहेत. वाहनांचे प्रत्येक नियम मुंबईतच का लावले जातात, शहरात वाहनाचा वेग ४०च्या आतच असल्यामुळे सीटबेल्टचा नियम शहरांच्या बाहेर बंधनकारक करण्यात यावा असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या वाहनाला पालघर जिल्ह्यात महामार्गावर अपघात होऊन त्यात सायरस मिस्त्री यांच्यासह दोन जणांचा त्यात मृत्यू झाला होता. मोटारीत मागे बसलेले सायरस मिस्त्री आणि त्याच्यासोबत असणारे त्यांचे निकटवर्तीय यांनी सीटबेल्ट न लावल्यामुळे ते वाचू शकले नाहीत, असे तपासात समोर आले. त्यानंतर मोटारीत मागे बसणाऱ्या सह प्रवाशांनादेखील सीलबेल्ट सक्तीचे करण्यात आले आहे.
मुंबई वाहतूक पोलिस विभागाने १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत चारचाकी वाहनात चालकासह मागे बसणाऱ्या सह प्रवाशांना सीटबेल्ट सक्तीचे करण्यात आल्याचे पत्रक जारी केले होते. हा नियम १ नोव्हेंबरपासून मुंबईत लागू करण्यात आला आहे. ज्या चारचाकी वाहनांना सीटबेल्ट नाही त्यांना सीटबेल्ट बसवण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी ३१ ऑक्टोबर रोजी संपला आहे.
मुंबईत १ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या सीलबेल्ट सक्तीमुळे सामान्य मुंबईकरामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. जे नियम शहराच्या बाहेर महामार्गांवर लागू केले पाहिजे ते शहरात लागू करण्यात येतात. मुंबई शहरात वाहनांच्या गर्दीमुळे वाहनांची गती ४०च्या आतच असते, चारचाकीचा अपघात झाला तरी त्यात मृत्यूमुखी पडण्याची संख्या कमी आहे आणि शहरात अपघातात मृत्यू होण्याचे कारण केवळ सीटबेल्टच नाही इतरही कारणे आहेत. त्यामुळे शहरात सीटबेल्ट सक्ती बंधनकारक करू नये, असे दादर येथे राहणारे रामदास साळवी यांनी म्हटले आहे.
टॅक्सी चालक रामनिरंजन यादव यांच्याकडे सीटबेल्ट सक्तीबाबत विचारले असता, वाहतूक पोलिसांचे नियम आहेत तर पाळावेच लागणार, मात्र याचा परिणाम थेट आमच्या व्यवसायावर होऊ शकतो. अनेक प्रवासी सीलबेल्ट लावण्यास इच्छुक नसतात, सीलबेल्ट सक्तीमुळे चौथ्या प्रवाशाचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे यापुढे टॅक्सीमध्ये तीनच प्रवासी घेतले जाईल, असे यादव यांनी म्हटले आहे. तर शेअर्स टॅक्सी चालकांनी नाराजी व्यक्त करत चार प्रवासी घेतले तरच आम्हाला भाडे परवडते. सीटबेल्ट सक्तीमुळे आता तीनच प्रवासी घ्यावे लागणार असून भाडे वाढ करावी लागणार असे मागील काही वर्षांपासून दादर ते केईएम रुग्णालय येथे शेअर्स टॅक्सी चालवणारे प्रताप पुकळे यांनी म्हटले आहे.
माटुंगा येथे राहणारे हेमंत कांबळे यांच्या दोन स्कुल व्हॅन आहेत. त्यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. “कोरोनाच्या काळात २ वर्षे शाळा बंद असल्यामुळे सर्वात जास्त स्कुल बस व्हॅन चालकाचे नुकसान झाले आहे. आता कुठे आमची गाडी रुळावर येत असताना वाहतूक पोलिसांनी काढलेल्या सीटबेल्ट सक्तीमुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. स्कुल व्हॅनमध्ये ८ विद्यार्थ्यांची परवानगी मोटार परिवहन विभागाने दिलेली आहे. स्कुल व्हॅनमध्ये मागच्या सीटवर सीटबेल्ट नसल्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसवून घ्यावे लागणार आहेत. परंतु स्कुल व्हॅनला सीटबेल्ट सक्तीच्या नियमाबाबत अद्याप कुठलीही कल्पना आम्हाला मिळालेली नसल्याचे हेमंत कांबळे यांनी म्हटले आहे.
“शहरात चारचाकी वाहनांत चालकासह सह प्रवासी यांना सीटबेल्ट सक्ती करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत दंडाची कारवाई न करता सीलबेल्ट न घालणाऱ्या चारचाकी वाहनांना थांबवून त्यांना समज देण्यात येत आहे आणि सीटबेल्ट नसणाऱ्या वाहनांना सीटबेल्ट बसवून घ्या असे सांगून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या एका पोलीस अधिका-यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.