नाशिकमधील वीर सावरकरांच्या ‘त्या’ ऐतिहासिक क्षणाला मिळाला उजाळा 

नाशिक महापालिकेने ९ मे १९५३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. त्या पुतळ्याचे लोकार्पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हस्ते झाल्याचे छायाचित्र समीर कस्तुरे यांनी ट्विट केले आहे.

126

नाशिक महापालिकेने ९ मे १९५३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. त्या पुतळ्याचे लोकार्पण स्वातंत्र्यवीर सावरकर veer savarkar यांच्या हस्ते झाल्याचे छायाचित्र समीर कस्तुरे यांनी ट्विट केले आहे. यानिमित्ताने एका ऐतिहासिक क्षणाच्या आठवणीला उजाळा मिळाल्याचे समीर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यानिमित्ताने १९५३ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सभेचा वृत्तांत इथे देत आहोत.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने एक सभा घेण्यात आली होती. सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाबाहेरील चौकात उंच व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठावर वीर सावरकर veer savarkar चढताच क्रांतिकारकांच्या जयजयकाराने तो चौक दणाणून गेला होता. या सभेला जनसमुदायही प्रचंड संख्येने उपस्थित होता. सभेचा प्रारंभ मुलींनी स्वागत गीताने केला. स्वागतपद्ये झाल्यावर वीर सावरकर व्यासपीठावरून उतरले आणि सभा प्रमुखांसमवेत तेथून एक फर्लांग तरी दूर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पोहचले. तेथे त्यांच्या हस्ते जॅक्सन बागेचे रुपांतर अधिकृतपणे छत्रपती शिवाजी उद्यानात करण्यात आले. जॅक्सन बागेचे छत्रपती शिवाजी उद्यान झाल्याने परकीयांचे राज्य जाऊन स्वकीयांचे राज्य आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करून आणि नगरपित्याशी ओळख करून घेऊन वीर सावरकर पुन्हा व्यासपीठावर चढले. त्यांच्या  शेजारी पुण्याचे महापौर हिंदुसभानेते ग.म. नलावडे आणि नाशिकचे नगराध्यक्ष लोणारी बसले होते. लोणारींनी प्रास्ताविक भाषण संपविताना वीर सावरकरांना भाषण करण्याची विनंती केली. वीर सावरकरांचे एक तास स्फूर्तिदायक भाषण झाले. या भाषणात त्यांनी छत्रपतींच्या राजनीतीवर भर देऊन तीच राजनीती राज्यकर्त्यांनी आचरावी, असे सांगितले. ते म्हणाले, `महाराज हे केवळ अहिंसेचे वा हिंसेचे भोक्ते नव्हते ते केवळ चढाई किंवा माघार घेत नसत. तर परिस्थितीप्रमाणे तिला तोंड देऊन तिच्यावर मात करीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वासंबंधी आणि मराठ्यांचे राजदूत गोविंदराव काळे यांच्या पत्राचा उल्लेख करून १७व्या आणि १८व्या शतकातील त्यांच्या राज्याचा हेतू हिंदू राज्य स्थापण्याचा कसा होता आणि आजही हिंदु राज्यावाचून आपले प्रश्न सुटणे कसे अशक्य आहे, हेही विषद करून सांगितले.

आजच्या राज्य कारभाराकडे वळून वीर सावरकर veer savarkar म्हणाले की, आजच्या राज्य कारभारात जे काही दोष आहेत, त्यांचे उत्तरदायित्व केवळ राज्यकर्त्यांवर नसून ते त्यांना निवडून दिलेल्या जनतेवरही आहे. आज एखाद्याला मत देऊन निवडून द्यावयाचे, त्यानंतर त्यांच्यावर टीका करायची आणि पुन्हा परत त्यालाच मते देऊन निवडायचे, ही मूर्ख खोड जोपर्यंत जनता टाकणार नाही, तोपर्यंत राज्य कारभाराचा दोष एकट्या राज्यकर्त्यांवर राहणार नाही आणि राज्य कारभार सुधारणारही नाही. अशा प्रकारचे युक्तिवादपूर्ण ऐतिहासिक आणि क्रांतिकारक भाषण एक तासापर्यंत देऊन वीर सावरकर थांबले तोच जनतेतून त्यांचे आणि क्रांतिकारकांच्या नावांचा प्रचंड जयजयकार टाळ्यांच्या गजरात चालू झाला. तेवढ्यात नगरपालिकेच्या वतीने जानोरकर यांनी सर्वांचे आभार मानले. महापौर नलावडे यांनी ध्वनिक्षेपकावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्मा कान्हेरेंचा जो जयजयकार केला, तो जनतेने उचलून धरून वीर सावरकर सभास्थानावरून बाहेर पडेपर्यंत सारखा चालूच होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.