Manholes : मुंबईच्या मॅनहोल्समध्ये आता स्टीलच्या जाळ्या

183
Manholes : मुंबईच्या मॅनहोल्समध्ये आता स्टीलच्या जाळ्या
Manholes : मुंबईच्या मॅनहोल्समध्ये आता स्टीलच्या जाळ्या

मुंबईतील पर्जन्य जल, मलनिसारण व इतर सेवांसाठी असलेल्या वाहिन्यांवरील प्रवेशमार्ग अर्थात मॅनहोल्सशी निगडित दुर्घटना टाळण्‍यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या प्रवेशिकांमध्ये (मॅनहोल) मजबूत अशा संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला. त्याकरता चार प्रकारच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. त्यातील एक प्रतिकृती (प्रोटोटाईप) अंतिम निश्चित करण्यात आली असून त्या प्रतिकृतीनुसारच मुंबईतील सर्व मॅनहोल्समध्ये या जाळ्या टप्प्याटप्प्याने बसविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई महानगरात पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिसारण वाहिन्यांचे मोठे जाळे आहे. या वाहिन्यांची स्वच्छता, देखभाल व दुरुस्तीसाठी त्यामध्ये शिरण्याचा प्रवेशमार्ग (मॅनहोल्स) असतो. या मॅनहोल्सवर झाकण लावलेले असते, जेणेकरुन त्यामध्ये मनुष्य अथवा प्राणी किंवा वाहन आदी पडू नयेत. मात्र बऱ्याच वेळा या मॅनहोल्सची झाकणे नागरिकांनी परस्पर काढल्याची किंवा प्रसंगी ही झाकणे चोरीला जाण्याच्या घटना घडतात व त्यातून अपघात तथा दुर्घटना घडतात. यावर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे, मॅनहोल्‍सना संरक्षक जाळ्या बसविण्‍यासंदर्भात उच्च न्यायालयानेही महानगरपालिकेला सूचना केली आहे.

New Project 2023 07 05T195641.936

मॅनहोल्स अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाकडून करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मॅनहोल सर्वेक्षणासाठी विशेष सूचना अलीकडे दिल्या होत्या. तसेच, मॅनहोल्स आणि चेंबर्सच्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश आयुक्त चहल यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनीही विशेष बैठक बोलावून नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता, अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना म्हणून सर्व मॅनहोल्समध्ये मजबूत अशी संरक्षक जाळी बसवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासोबतच संरक्षक जाळ्यांची प्रतिकृती अर्थात प्रोटोटाईप विकसित करण्याचेही निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार एक लोखंडी व एक स्टिलच्या जाळ्याची प्रतिकृती एक नाईलॉनच्या जाड दोरीच्या आधारे बनवलेल्या लोखंडी जाळी अशाप्रकारे तीन प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. मागील दहा दिवसांपूर्वी यासर्व जाळ्यांच्या प्रतिकृतीचे सादरीकरण अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांच्यासमोर करण्यात आले. त्यामध्ये सर्वांनुमते अधिक मजबूत असलेल्या स्टीलच्या जाळीच्या प्रतिकृतीला मान्यता देण्यात आल्या. त्यानुसार या प्रतिकृतीप्रमाणेच जाळ्या बनवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

(हेही वाचा – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्यच!)

प्रोटोटाईप तयार

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागाने मॅनहोलसाठी संरक्षक जाळ्यांची स्‍वतंत्र प्रतिकृती (प्रोटोटाईप) विकसित केली आहे. संरक्षक जाळ्यांसाठी याआधी डक्टाईल धातूचा वापर करण्यात आला होता. आता नवीन प्रोटोटाईपमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. कारण स्टेलनेस स्टीलचा वापर केल्याने या मॅनहोलच्या संरक्षक जाळीचे आयुष्यमान वाढणार आहे. संरक्षक जाळ्यांचे ग्रीलचे डिझाईन आणि प्रत्यक्षात येणारा खर्चाचा अंदाज ठरविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. लवकरच संरक्षक जाळ्यांच्या बाबतीत निविदा प्रक्रियेलाही सुरूवात होणे अपेक्षित आहे. तसेच, संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात टप्पेनिहाय पद्धतीने मॅनहोलवर जाळी बसविण्याची कार्यवाही यंदाच्या पावसाळ्यातच सुरु करुन पुढील पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पूर्ण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. माननीय उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश लक्षात घेवून त्यानुसार सर्व मॅनहोल सुरक्षित करण्यात येतील,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.