मुंबई ते नागपूर फक्त ८ तासात! समृद्धी महामार्गावर प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा

103

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी दरम्यानचा पहिला टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नियोजन सुरू आहे. तसेच या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध सुविधा मिळणार आहेत.

( हेही वाचा : सीटबेल्ट सक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी; महामार्ग मंत्रालयाच्या आदेशात काय म्हटले आहे? )

या असतील सुविधा

७०१ किमीच्या मार्गावर १६ ठिकाणी फूडमॉल, पेट्रोलपंप, वाहनतळ या सुविधा देण्यात येणार आहेत. यासाठी एमएमआरडीसीने शनिवारी निविदा काढल्या. नव्या वर्षात या कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर हे अंतर केवळ आठ तासांमध्ये पार करता येणार आहे.

लवकरच नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्गालगत पेट्रोलपंप, जेवणाची सोय, पार्किंग आणि इतर काही सुविधा पुरविणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे एमएसआरडीसीने महामार्ग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार केला आहे.

टोल किती असणार? 

सध्याच्या धोरणानुसार, समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर प्रवासासाठी १ हजार २०० रुपये टोल भरावा लागणार आहे.मुंबई ते नागपूर या ७०१ किमी अंतरावर टोलवसुलीकरता धोरणनिश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, चार चाकी हलक्या वाहनांसाठी प्रत्येक किलोमीटर मागे १.७३ रुपये टोल आकारणी होईल. बस आणि ट्रकला प्रती किमी मागे ५.८५ रुपये, अवजड वाहनांसाठी ९. १८ रुपये आणि अति अवजड वाहनासाठी प्रती किमी ११.१७ रुपये टोल द्यावा लागेल. हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत कायम असणार आहेत. या प्रकल्पासाठी १३ बँकांनी २८ हजार कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले आहे. या कर्जाचा कालावधी २५ वर्षे आहे. टोलमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून या कर्जाची परतफेड करणे शक्य होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.