Pet Funeral Facility : पाळीव प्राण्यांसाठीच्या अंत्यविधीची पहिली सुविधा मालाडमध्ये!

अशी दहन सुविधा देणारी देशातील पहिली मुंबई महापालिका!

200
Pet Funeral Facility : पाळीव प्राण्यांसाठीच्या अंत्यविधीची पहिली सुविधा मालाडमध्ये!
Pet Funeral Facility : पाळीव प्राण्यांसाठीच्या अंत्यविधीची पहिली सुविधा मालाडमध्ये!
पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा देणारे मुंबई देशातील पहिले शहर ठरले असून मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगरात पाळीव लहान प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहन सुविधा सुरु करण्यात आली आहे. नैसर्गिक वायू आधारित दहन तंत्रज्ञानाची ही पद्धती शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ही सुविधा विनामूल्य मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगरात पाळीव लहान प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहन सुविधा करण्यात आली आहे. नैसर्गिक वायू आधारित दहन तंत्रज्ञानाची ही पद्धती शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक देखील आहे. ही सुविधा वापरासाठी खुली करण्याचा छोटेखानी सोहळा आज (दिनांक १५ सप्टेंबर २०२३) मालाड येथे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी शेट्टी हे बोलत होते. या सुविधेचा उपयोग करतानाच लोकसहभागातून ती उत्तमोत्तम करण्याचेही शेट्टी यांनी आवाहन केले. मुंबईच्या अशा अभिनव नागरी सेवांचे आणि पुढाकाराचे देश पातळीवर अनुकरण करण्यात येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेचे उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त शैलेश पेठे, सहायक महाव्यवस्थापक डॉ. सचिन कुलकर्णी, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज माने, डॉ. योगेश वानखेडे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राठोड यांच्यासह विविध प्राणिमित्र संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था आहे. नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित हे दहन होणार असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. पीएनजीवर आधारीत देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, अशी माहिती उपआयुक्त संजोग कबरे यांनी यावेळी दिली.
New Project 2023 09 15T181948.219
अनेक वर्षांपासून प्राणिमित्रांकडून मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त दहन सुविधेसाठी मागणी होत होती, त्याची पूर्तता या माध्यमातून झाली आहे. या दहन व्यवस्थेसाठी इंधन स्वरुपात वायू पुरवठ्याची सुविधा ही महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, लवकरच याठिकाणी लहान पाळीव प्राण्यांचे शवागार (मॉर्च्युरी) ची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले. ही सुविधा मालाडमध्ये उपलब्ध असली तरी त्याचा उपयोग पश्चिम उपनगरासह संपूर्ण मुंबईतील प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी करता येईल. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ही सुविधा विनामूल्य मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा व सहजपणे उपयोग होईल. सदर दहन व्यवस्थेची पाच वर्षांची देखभाल व प्रचालन व्यवस्था ही मे. अनिथा टेस्ककॉट इंडिया प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, असे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी नमूद केले.
या पाळीव प्राणी दहन सुविधेसाठी पुढाकार घेणारे पशुवैद्यकीय विभागाचे तत्कालीन प्रमुख दिवंगत डॉ. योगेश शेट्ये यांच्या कुटुंबीयांचा खासदार गोपाळ शेट्टी यांनी याप्रसंगी सत्कार केला. तसेच उपस्थित प्राणिमित्र संघटनांच्या प्रतिनिधींचाही पुष्पगुच्छ प्रदान करुन सत्कार करण्यात आला. लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, ‌श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मालाडमध्ये उपलब्ध करुन देत  महानगरपालिकेने दयाभाव जोपासला आहे. नैसर्गिक वायू आधारीत दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे. ही सेवा विनामूल्य असून मुंबईतील प्राणिमित्र आणि नागरिक यांनी लहान पाळीव प्राण्यांचा शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी होण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.
पाळीव प्राणी दहन सुविधा प्रकल्पाची संक्षिप्त वैशिष्ट्ये 
– मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगरात कॅटल पाँड कार्यालय येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने लहान पाळीव प्राण्यांचे मरणोत्तर शास्त्रोक्त व पर्यावरण पूरक पद्धतीने दहन करण्याची सुविधा.
– ही सुविधा मृत लहान प्राणी जसे पाळीव व भटके श्वान, मांजरी इत्यादींच्या दहनासाठी उपलब्ध.
– ही दहन सेवा विनामूल्य.
– या दहन व्यवस्थेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार.
– या दहन व्यवस्थेची क्षमता ही ५० किलो प्रतितास एवढी .
–  महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून दिलेली अशाप्रकारची ही पहिलीच पाळीव प्राणी दहन व्यवस्था.
– या दहन व्यवस्थेच्या संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८८७३८-८७३६४ हा आहे.
– प्राणी दहन करण्यासाठी महानगरपालिकेचे किंवा खासगी नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक.
– पाळीव प्राणी (श्वान) असल्यास मुंबई महानगरपालिकेची श्वान अनुज्ञाप्ती आवश्यक .
– नागरिकांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड/पॅनकार्ड/वाहन परवाना (ड्राईव्हिंग लायसन्स)/ रेशनकार्ड यापैकी एक व पत्त्याच्या पुराव्यासाठी पारपत्र (पासपोर्ट)/वाहन परवाना (ड्राईव्हिंग लायसन्स)/ वीज देयक/पाणी देयक यापैकी एक घरचा पत्ता म्हणून सादर करणे आवश्यक.
– प्राणिप्रेमी असतील तर भारतीय जीवजंतू मंडळाने दिलेले कोणतेही एक ओळखपत्र सादर करावे लागेल.
– या दहन व्यवस्थेची ५ वर्षांसाठीची देखभाल व प्रचालन व्यवस्था अनिथा टेस्ककॉट इंडिया प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.