BMC : शौचालय उभारणीत महापालिकेची जागा निवड चुकली; दोन वर्षांपूर्वी बनवलेले शौचालय वापरण्यापूर्वीच बनले खंडर

माहिम कॉजवेला एक मजली शौचालयाची बांधणी एक ते दीड वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते.

142

मुंबई महापालिकेच्यावतीने टप्पा ११ अंतर्गत बांधण्यात आलेल्या बहुतांशी शौचालयांच्या उभारणीसाठी निवडलेल्या जागांचे नियोजनच चुकल्याची बाब समोर येवू लागली आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या माहिम कॉजवे येथील जागेत सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दीड वर्षांहून अधिक कालावधी लोटूनही हे शौचालय लोकांसाठी खुले करून देण्यात आलेले नाही. परिणामी नव्याने बांधलेले सार्वजनिक शौचालय हे खंडर बनले असून संस्थेच्या नेमणुकीच्या नावाखाली हे शौचालय खुले केले जात नसल्याने नक्की हे शौचालय कुणासाठी बांधले,  असा सवाल स्थानिक रहिवाशांसह पर्यटकांकडून केला जात आहे.

संपूर्ण मुंबईत वस्ती स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत एकूण २२ हजार ७७४ शौचालयांकरता निविदा काढून त्या कामांना मंजुरी देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात या कामांना मार्च २०१९मध्ये सुरुवात झाली आहे. त्यानुसार शौचकुपांची कामे पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत माहिम कॉजवेला एक मजली शौचालयाची बांधणी एक ते दीड वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे नवीन शौचालय ज्या ठिकाणी बांधले आहे, त्या शौचालयाच्या शेजारी दहा ते बारा वर्षांपूर्वी फ्युम्ज कंपनीच्या माध्यमातून जाहिरातीच्या बदल्यात शौचालयाची उभारणी केलेली आहे. या शौचालयाचा लाभ स्थानिक रहिवाशांना नि:शुल्क होत आहे. मात्र, त्या शौचालयाच्या शेजारीच नव्याने महापालिकेने शौचालय उभारले. त्यामुळे या शौचालयाच्या देखभालीसाठी संस्थेची नियुक्ती करण्याचा वाद निर्माण झाल्याने महापलिकेने हे शौचालय संस्थेअभावी लोकांना खुले करून दिले नाही. परिणामी नव्याने बांधलेले चांगल्या दर्जाचे शौचालय खंडर बनल्याचे पहायला मिळत आहे.

mahim1

(हेही वाचा Aurangzeb : औरंगजेब आणि मविआचा डीएनए एकच; चित्रा वाघ यांचा घणाघात )

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात येत असून ही संस्था पुढे न आल्याने हे शौचालय खुले करून देण्यात आले नाही. परंतु आता संस्था पुढे आली आहे. त्यामुळे नियुक्त संस्थेच्या माध्यमातून लघुशंकेशिवाय इतर सेवांसाठी शुल्क आकारले जाईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तर माजी स्थानिक नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी या शौचालयाच्या उभारणीसाठी केलेली जागेची निवड चुकीची आहे. आधीच जिथे रहिवाशांना चांगल्या प्रकारे स्वच्छता असलेल्या शौचालयांमध्ये नि:शुल्क सेवा मिळत आहे, तिथे महापालिकेच्यावतीने शुल्क आकारुन सेवा देणारे शौचालय उभारणे चुकीचे आहे. त्यामुळे जिथे नि:शुल्क सेवा मिळत आहे, त्याच्या शेजारी शुल्क देऊन शौचालयाचा वापर करणारे लोक येणार कसे असा सवाल करत मिलिंद वैद्य यांनी त्यामुळेच कोणतीही संस्था पुढे येत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, आता एक संस्था पुढे आली आहे, असे त्यांनी सांगितले.

मनसेचे माजी नगरसेवक मनिष चव्हाण यांनी, हे शौचालय कुणा नगरसेवकाच्या निधीतून बांधले नसून महापालिकेच्या निधीतून बांधले आहे. त्यामुळे कुणाच्या शिफारशीची वाट न पाहता महापालिकेने एवढ्या चांगल्या दर्जाचे शौचालय बांधले आहे, ते सर्वांसाठी त्वरीत खुले करावे. कोणाच्या शिफारशीने संस्थेची नेमणूक करण्याऐवजी महापालिकेने स्वत: पुढाकार घेऊन स्वत: याची देखभाल करावी आणि तात्काळ रहिवाशांसह याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी या सार्वजनिक शौचालयांची सुविधा खुली करून द्यावी, असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.