MSRTC Bank Election : एसटीच्या बँक निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलने जिंकल्या १९ जागा; शरद पवारांना धोबीपछाड

228

महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बँकेतील संचालकपदाच्या १९ जागांसाठी ही निवडणूक झाली होती. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून कामगार संघटनेच्या वर्चस्वाला धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे.

या विजयानंतर सदावर्ते यांच्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची २३ जून रोजी राज्यभरातील २८१ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडली. मुंबईतील कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे या निवडणुकीची मतमोजणी पार पडली.विविध पक्षांच्या प्रस्तापित कामगार संघटनांना दूर करत नव्याने एसटी महामंडळात आलेल्या दोन संघटनांनी प्रचंड मुसंडी मारली.

(हेही वाचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार २०२३’)

ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा ही जादा मतदान घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या पॅनल मात्र, पिछाडीवर गेले असून, ७ व्या क्रमांकावर दिसून आले आहे.

गेल्या १५ वर्षांपासून स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेवर कामगार संघटनेचे वर्चस्व होते. यानिमित्ताने एसटी महामंडळात असलेल्या विविध कामगार संघटनांमध्ये गुणरत्न सदावर्ते यांना चांगला पाठिंबा असल्याचे दिसत आहे. यापूर्वी एसटी पतसंस्थेच्या निवडणुकीतही गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने असाच मोठा विजय मिळवला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर काही दिवसांमध्येच ही निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीतही गुणरत्न सदावर्ते यांच्या कष्टकरी जनसंघाच्या परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व एकूण १७ जागांवर विजय मिळवला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.