‘एमपीएससी’कडून अभ्यासक्रमाचा गोंधळ

154

स्पर्धा परीक्षार्थींनी तीव्र आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने २०२५ पासून नवा अभ्यासक्रम लागू करण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) केली. मात्र, एमपीएससीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोंधळात अभ्यासक्रम नेमका कधीपासून लागू होणार? या संभ्रमात विद्यार्थी सापडले आहेत.

( हेही वाचा : WTC स्पर्धेतून ‘हा’ संघ बाहेर; कोणत्या दोन टीम होणार अंतिम सामन्यासाठी पात्र?)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय एमपीएससीने कोणतीही पूर्वकल्पना न देता घेतला. यासंदर्भात नेमलेल्या दळवी समितीने २ मे २०२२ला आपला अहवाल आयोगाला सादर केला. त्यानंतर २४ जून २०२२ला अभ्यासक्रमात नवीन बदल करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर २० जुलै २०२२ला इंग्रजी भाषेत तर १७ ऑक्टोबर २०२२ला मराठी भाषेतील अभ्यासक्रम सादर करण्यात आला. या नवीन अभ्यासक्रमानुसार पहिली परीक्षा ३ जून २०२३ला, तर मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर २०२३ ला होणार आहे.

स्पर्धा परीक्षार्थी हे किमान चार ते पाच वर्षे ‘एमपीएससी’चा अभ्यास करतात. याआधी मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्याच पद्धतीने अभ्यास केला. आता आयोगाने नव्याने केलेला बदल चांगला असला तरी, केवळ सात महिन्यांत अभ्यास पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे राज्यसेवेसारख्या काठीण्यपातळी असलेल्या परीक्षेचा अभ्यास इतक्या कमी दिवसांत कसा करावा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. याविरोधात राज्यभरातील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

पुण्यातील काही विद्यार्थी संघटनांनी याविरोधात आक्रमकपणे आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी विनंती राज्य लोकसेवा आयोगाला केली. मात्र, त्यानंतरही एमपीएससीने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.

अडचण काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२३ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधातील आंदोलनाच्या दबावात येत राज्य सरकारने नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. मात्र, दुसऱ्या बाजूने सरकारच्या निर्णयाचा विरोध करीत नवीन अभ्यासक्रम आताच लागू करा, अशा मागणीनेही जोर धरला. नवीन अभ्यासक्रम लागू करण्यावर असे दोन मतप्रवाह समोर आल्याने ‘एमपीएससी’नेही अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे कळते.

बैठकीनंतरही निर्णय नाही

राज्य सरकारने २०२५ पासून अभ्यासक्रम लागू करण्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत आयोगातील काही सदस्य, अधिकारी आणि अभ्यासक्रम समितीच्या अध्यक्षांची बैठक झाली. त्यामुळे या बैठकीनंतर ठोस निर्णय ‘एमपीएससी’कडून जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही.

अभ्यासासाठी कमी वेळ

एमपीएससीचा अभ्यासक्रम २०२३ पासून अचानक बदलण्यात आला. युपीएससी परीक्षेसारखा हा अभ्यासक्रम केला गेला. विद्यार्थी अनेक वर्षांपासून जुन्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करत आहेत. परंतु अभ्यासक्रम बदल्यामुळे त्यांची गेल्या काही वर्षांपासूनची मेहनत वाया जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.