Mumbai Monsoon : मुंबईत पाऊस; मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर

226

शनिवार, २४ जूनपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील ४८ तासांत मोसमी वारे मुंबईत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सगळ्यात जास्त पाऊस ५.३० ते ७.३० या वेळेत पडला आहे. या काळात ८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईत जोरदार पाऊस असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीमधील कोस्टल रोडची रविवारी, २५ जून रोजी पाहणी केली. तसेच येथ पाणी साचण्याची कारणे जाणून घेतली.

या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. रविवारी जरी याठिकाणी पाणी नसले, तरी शनिवारी मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर जलमय झाला होता. यामुळे अनेक वाहने देखील अडकून पडल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी इथे रविवारी भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली. एकनाथ शिंदे यांनी अंधेरीतील मिलन सबवेची पाहणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, रविवारी मिलन सबवे परिसरात १ तासात जवळपास ७० मिमी पाऊस पडला. तरीही येथील वाहतूक अजूनही सुरळित सुरु आहे. मिलन सबवेमधील लावलेली सिस्टिम सुरु आहे का?, काही अडचणी आहे का?, हे पाहण्यासाठी इथे आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी संध्याकाळपर्यंत मुंबई, नवी मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मुंबईत मोसमी वारे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे सध्या सुरु असणारा पाऊस हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच गेल्या २४ तासांत नैऋत्य मोसमी वारे सक्रीय झाले असून त्यामुळे दक्षिण कोकण भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. हवामान विभागाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तर पुढील ५ दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

(हेही वाचा Mumbai Rain : पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी तुंबई होऊन रस्ते वाहतूक खोळंबली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.