मोडक पाठोपाठ तानसा तलावही ओसंडून वाहू लागला

90

मोडक सागर तलाव भरून वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच गुरुवारी, 14 जुलै रोजी आणखी एक चांगली बातमी मुंबईकरांसाठी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव गुरुवारी रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू लागल आहे. या तलावाला एकूण ३८ दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

बुधवारी, १३ जुलै २०२२ रोजी मोडक सागर जलाशय ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ गुरुवारी तानसा तलावही ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे ७ तलावांपैकी २ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागली आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे.

तानसा तलावाचा विचार करता, मागील वर्षी २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता तर त्याआधीच्या वर्षी म्हणजे २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन हा तलाव वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. पैकी, तानसा तलावाची जलधारण क्षमता सुमारे १ लाख ४५ हजार ०८० दशलक्ष लीटर इतकी आहे.

पुढील १७ मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत एकूण ९,५२,५५० दशलक्ष लिटर (६५.८१ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ८ महिने म्हणजेच २४७ दिवस म्हणजेच पुढील १७ मार्च २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे. सात तलावांपैकी मोडक सागर गुरुवारपासूनच भरून वाहू लागला आहे. तर तानसा व तुळशी तलाव कोणत्याही क्षणी भरून वाहू लागणार आहे. तर उर्वरित तलावांपैकी गुरुवार पर्यंत मध्य वैतरणा तलावात १,२५,२९६ दशलक्ष लिटर (६४.७४ टक्के)इतका पाणीसाठा आहे. तर भातसा तलावांत ४,२५,९१४ दशलक्ष लिटर (५९.४० टक्के) इतका पाणीसाठा, विहार तलावांत १६,४९७ दशलक्ष लिटर (५९.५६ टक्के) पाणीसाठा जमा आहे. तसेच, अप्पर वैतरणा तलावांत १,२२,५६९ दशलक्ष लिटर ५३.९८ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. त्यामुळे उर्वरित चार तलावांत ५० टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झालेला असल्याचे समोर येते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.