Mill Workers : गिरणी कामगारांच्या घरांचे श्रेय कुणाला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये लागली चढाओढ

220

गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना घरांचा लाभ देण्याच्या प्रयत्नात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे. गिरणी कामगारांच्या सन २०२० मधील सोडतीत जवळपास १६२ गिरणी कामगार तथा वारस यशस्वी ठरल्याने उर्वरीत सर्व पात्र लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या आतमध्ये घराचा ताबा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी केले. शिवाय घराचे मेंटनन्स हे १ जुलैपासूनच आकारण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे श्रेय आपल्या पक्षातील आमदार सुनील राणे यांच्या समितीला दिले आणि घरासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घर देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे या दोघांच्या चढाओढीमध्ये गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घर मिळू दे म्हणजे झाले, असे म्हणावे लागेल.

मार्च-२०२० मध्ये मुंबईतील बॉम्बे डाईंग मिल, बॉम्बे डाईंग टेक्सटाइल मिल आणि श्रीनिवास मिलमधील ३,८९४ सदनिकांसाठी म्हाडातर्फे सोडत काढण्यात आली. सदर सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार/वारसांपैकी एकूण १,४१२ यशस्वी गिरणी कामगार वारस यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठीचे तात्पुरते देकार पत्र देण्यात आले असून उर्वरित २,४८२ गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित करून व सदनिकीच्या विक्री किमतीचा भरणा केल्यानंतर त्यांना चाव्यांचे वाटप तात्काळ केले जाणार आहे.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र १६२ यशस्वी गिरणी कामगार तथा वारसांना गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या व वितरणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री शिंदे  यांनी आज प्रत्यक्षात गिरणी कामगारांना घरांच्या चाव्यांचे वाटप होत आहे. आज गिरणी कामगारांना प्रत्यक्ष चाव्या आणि पत्र दिले जात आहेत. सन २०२० मधील गिरणी कामगार सोडतीतील उर्वरित सुमारे ३,५०० यशस्वी गिरणी कामगार तथा वारसांना येत्या ३ महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले. तसेच  सदनिकेच्या चाव्या मिळत असलेल्या गिरणी कामगारांना सदनिका विक्री किंमतीचा भरणा उशिरा केल्याबद्दल लावलेला दंड माफ करून ०१ जुलै २०२३ पासून सदनिकेसाठीचा देखभाल- दुरुस्ती खर्च आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले.

(हेही वाचा National MLS Council : बीकेसीमध्ये भरला ‘राजकीय मेळा’; देशभरातील दीड हजार आमदारांची उपस्थिती)

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरणी कामगारांची सन २०२० मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र आत्तापर्यंत केवळ २६  यशस्वी गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित होऊन विक्री किंमतीचा भरणा केलेला होता. सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/वारस यांच्या पात्रतेविषयक कामाला गती मिळून त्यांना सदनिकेचा लवकरात लवकर ताबा मिळावा, यासाठी आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार केली. समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे कमी कालावधीत जवळपास १६२ यशस्वी गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित झाली असल्याचे त्यांनी सांगितले.  येत्या तीन महिन्यात उर्वरित सुमारे ३५०० गिरणी कामगार तथा  वारस यांची पात्रता पूर्ण करुन त्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिलेच.  शिवाय गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ज्या गिरणी कामगार/वारसांची पात्रता निश्चित होत नाही ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन इतरही गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेवटच्या पात्र कामगाराला सदनिकेचा ताबा मिळत नाही तोपर्यंत हे काम सुरु राहील. सदनिका मिळण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व १ लाख ५० हजार गिरणी कामगारांना घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे लवकरच एक मोहीम सुरू करण्यात येणार असून विशेष कक्ष स्थापन केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

त्यामुळे राज्यातील शिवसेना आणि भाजपची युती असली तरी मुख्यमंत्र्यांच्या एक पुढे जावून घोषणा आणि आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरांचे श्रेय मुख्यमंत्र्यांच्या झोळीत पडू नये आणि आपल्याच कडे राहावे यासाठी उपमुख्यमंत्र्यांना आधीच सुनील राणे समितीला याचे श्रेय द्यावे लागले आणि अर्ज करणाऱ्या प्रत्येक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्याचे आश्वासन देत गिरणी कामगारांच्या घरांचे श्रेय आपल्याच झोळीत ओढून घेण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला.  त्यामुळे मूख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चढाओढीमध्ये गिरणी कामगारांना घरे मिळून त्यांचे भले  झाले म्हणजे झाले असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.