वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मानसिकता बनवावी! सरकारचा सल्ला 

वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पुढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी काही विद्यार्थी करीत आहेत.

67

कोविड १९ प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयांनी केले आहे, असे असतांना या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पुढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी काही विद्यार्थी करीत आहेत. वास्तविक पाहता वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही, असे  राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले.

(हेही वाचा : म्युकरमायकोसिस: उपचार नको डोळेच काढा! असे म्हणतील गोरगरीब!  )

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार!

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मंत्री देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यात कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १ जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे, त्यामुळे २ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जूनपासून घेण्याचे निश्चित करण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षातील कोरोनाचे संकट असतांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने परीक्षा यशस्वीरीत्या घेतली असून त्या सुरक्षित वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात १० जूनपासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपूर्णतः कोविड १९ सुरक्षा कवच पुरविले जाणार असून त्यांच्या आरोग्याची सर्वोतोपरी काळजी घेतली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. परीक्षा रद्द करणे हे केंद्रिय नियामक मंडळालाही ते मान्य नाही, शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. एकंदरीत या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे, परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावे, असे आवाहन शेवटी या निवेदनात त्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.