Marathi Bhasha Din : मराठीला आज ना उद्या अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल

विविध साहित्य प्रकारांमधून मराठी भाषा ही कवींनी मराठी मनामनांमध्ये रुजविली

609
Marathi Bhasha Din : मराठीला आज ना उद्या अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल

‘जगात हजारो भाषा बोलल्या जातात. त्यापैकी २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात. या सर्व भाषांमध्ये मराठीचा दहावा क्रमांक लागतो आणि संज्ञापनाच्या बाबतीत नादमाधुर्य असलेली मराठी ही प्रथम क्रमांकाची भाषा आहे. सुमारे २२०० वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या मराठीला आज ना उद्या अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल’, अशी भावना ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी मंगळवारी व्यक्त केली. ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din) आणि मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. (Marathi Bhasha Din)

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, २७ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२४ या कालावधीदरम्यान ‘मराठी भाषा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंगळवार २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा गौरव दिनही आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका सभागृहात आज एक विशेष कार्यक्रम पार पडला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी मा. सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, महानगरपालिका सचिव (प्र) संगीता शर्मा, अभिनेते अरुण कदम यांची उपस्थिती होती. तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Marathi Bhasha Din)

(हेही वाचा – Girish Chandra Ghosh: बंगालमध्ये नाट्याचा सुवर्ण काळ निर्माण करणारे प्रसिद्ध नाटककार !)

‘मराठी असे आमुची मायबोली’ या विषयावर व्याख्यान

यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांचे या कार्यक्रमात ‘मराठी असे आमुची मायबोली’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानात डॉ. शोभणे यांनी संत साहित्य, पद्य, लावणी, नाट्यगीत, चित्रपट गीत तसेच विविध काळांमधील कवी आणि गीतकारांच्या योगदानातून समृद्ध होत गेलेल्या मराठी भाषेचा इतिहास मांडला. (Marathi Bhasha Din)

मराठी ही काळानुरुप साकारातच गेली

या कार्यक्रमात डॉ. शोभणे म्हणाले की, सुमारे २२०० वर्षांचा समृद्ध वारसा असलेली मराठी ही काळानुरुप साकारातच गेली. कवी मुकुंदराज यांनी १११० साली ‘विवेकसिंधू’ या ग्रंथाच्या माध्यमातून मराठीचा गजर केला. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत सावता माळी, संत चोखामेळा आदींनी अभंग, ओव्या, भारूड आदींच्या माध्यमातून मराठी काव्यपरंपरा वृद्धींगत केली. संतांच्या अभिव्यक्तीमधून मराठी भाषा समृद्ध झाली. विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून संतांनी प्रबोधन केले. व्यवहारातील शब्दरचनांना संत सावता माळी आणि संत चोखामेळा यांनी पद्यात आणले. भारुडाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी अनेकांगी तत्त्वज्ञान सहजपणे मांडले. संत तुकाराम महाराजांनी अध्यात्मिक मौखिक भावना मोडित काढून अभंगातून व्यवहारीक जगणे प्रभावीपणे मांडले. शाहिरी वाङमयाने मराठी जनमाणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. बालकवी, गोविंदाग्रज, केशवकुमार, केशवसूत, कुसुमाग्रज, ग्रेस, आरती प्रभू, इंदिरा संत, शांता शेळके या कवींनी विविध साहित्य प्रकारांमधून मराठी भाषा ही मराठी मनामनांमध्ये रुजविली, अशा शब्दांत डॉ. शोभणे यांनी मराठी भाषेचा प्रवास उलगडला. (Marathi Bhasha Din)

मराठी भाषा गौरव दिनासारखा उत्सव जगात कुठेच नाही.

केवळ मराठीच नव्हे अन्य भाषिकांनीही मराठी भाषेचे गोडवे गायले. सन १६१९ साली फादर स्टिफन या कवीने ख्रिस्तीपुराणात मराठीचे वर्णन केले आहे. एका परकीय भाषेतील व्यक्तीच्या शब्दांतून मराठीचे गुणगान होणे, अलौकीक आहे. मराठी भाषा गौरव दिनासारखा (Marathi Bhasha Din) उत्सव जगात कुठेच होत नाही. मराठीचा इतका मोठा उत्सव आपण कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा करतो, ही बाब अभिमानास्पद असल्याचेही डॉ. शोभणे यांनी या वेळी सांगितले. (Marathi Bhasha Din)

माझ्या मुलांशी घरात मराठी भाषेतच बोलते – डॉ. अश्विनी जोशी

अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, ‘जगभरात सुमारे ९ कोटींपेक्षा अधिक लोक मराठी भाषेतून बोलतात, हे अभिमानास्पद आहे. आजकाल आपल्या मुलांसोबत घरी पालकांनी इंग्रजी भाषेत बोलावे, असे शाळा व्यवस्थापनाकडून सांगितले जाते. पण, मी माझ्या मुलांशी घरात मराठी भाषेतच बोलते. कारण, चिपळूणसारख्या गावात जन्म झालेली मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षाही मराठी साहित्य विषय घेऊनच उत्तीर्ण झाले होते. डॉ. शोभणे यांच्या व्याख्यानात मराठीचा प्रवास ऐकताना त्या परीक्षेची उजळणी होत असल्यासारखी माझी भावना झाली आहे. (Marathi Bhasha Din)

(हेही वाचा – Ravindra Jain: भजन गायन ते बॉलिवुडमध्ये संगीतकार !)

प्रशासनात मराठी भाषेचा प्रकर्षाने वापर करायला हवा

मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर होण्याच्या उद्देशाने सर्व विभागांमध्ये मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनातील लोकांनी प्रशासकीय संचिका, टिपणी आदी बाबींसाठी मराठी भाषेचा काटेकोरपणे वापर करायला हवा. यामुळे मराठी भाषेचा अधिकाधिक प्रभावी आणि परिणामकारक वापर करण्यास निश्चितच गती मिळेल. मात्र, केवळ मराठीचा अभिमान बाळगून चालणार नाही तर तिचे संवर्धन करण्याची जबाबदारीही आपण पार पाडायला हवी’, असा आशावादही डॉ. अश्विनी जोशी यांनी या वेळी व्यक्त केला. (Marathi Bhasha Din)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषेचा वापर, संवर्धन आदींच्या अनुषंगाने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सावंत यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महानगरपालिका संगीत कला अकादमीच्या चमुने राज्यगीत, वंदे मातरम, ईशस्तवन तसेच मराठी गौरव गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी रवींद्र काळे यांनी मानले. (Marathi Bhasha Din)

‘एकपात्री अभिनय’ स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नुकतीच ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचारी प्रितेश मांजलकर (प्रथम), स्वाती शिवशरण (द्वितिय), रेश्मा सोहनी (तृतिय), सुरेखा मराठे (उत्तेजनार्थ), रोहित पवार (उत्तेजनार्थ) यांचा या वेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुरस्कार राशी देऊन सन्मान करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनाच्या (Marathi Bhasha Din) निमित्त महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेकडून महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहात मंगलपासून पुढील तीन दिवसांसाठी ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती यानिमित्ताने महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Marathi Bhasha Din)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.