शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्ती बनवा, निशुल्क जागा मिळवा, मुंबई महापालिकेची योजना

241
शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्ती बनवा, निशुल्क जागा मिळवा, मुंबई महापालिकेची योजना
शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्ती बनवा, निशुल्क जागा मिळवा, मुंबई महापालिकेची योजना

निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. याच अंतर्गत यावर्षी घरगुती स्तरावरील श्रीगणेश मूर्ती या ४ फुट उंचीपर्यंतच्याच असणे व त्या केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरण पूरक साहित्य पासून तयार करणे बंधनकारक असणे; यासारख्या महत्वाच्या निर्णयांचा यात समावेश आहे. शाडू मातीच्या तसेच पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती तसेच मूर्ती घडवण्यासाठी “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर काही जागा नि:शुल्क स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांना काही प्रमाणात शाडू माती देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निसर्गास हानी पोहोचू नये तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विविध उत्सव आयोजित केले जावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. याच अंतर्गत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव-२०२३ साजरा करण्यासंदर्भात भाविक, मूर्तीकार तसेच गणेशमूर्ती साठवणूकदारांसाठी महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या ‘परिमंडळ २’ चे उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी कळविली आहे

केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच मूर्ती घडविणारे मूर्तीकार महानगरपालिकेतर्फे यंदाच्या वर्षीसाठी प्रायोगिक तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या जागेसाठी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून ही प्रक्रिया कार्यान्वित होणार आहे. ही संगणकीय प्रणाली २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कार्यरत राहणार आहे.

मूर्ती घडविण्यास मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार

गणेशमूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी तसेच साठवणूकदारांना मूर्ती ठेवण्याकरीता मंडप उभारण्यासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दि. ७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > For Citizen > Apply > Pandal (Ganpati/Navratri) > Online Murtikar/Stockist Permission या लिंकवर जाऊन दि. २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल. याठिकाणी पोलिस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या परवानगीचेही अर्ज असल्याने यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. परवानगीसाठी एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. मूर्तीकार तसेच मूर्ती साठवणूकदारांना सोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री शिंदेंनी केले आश्वस्त)

पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्यांना नवरात्रीपर्यंत नि:शुल्क जागा

शाडूच्या मातीपासून किंवा पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना यावर्षी प्रायोगिक तत्वावर व “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या धर्तीवर महानगरपालिकेतर्फे निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणारी जागा नवरात्री उत्सवाच्या समाप्तीपर्यंतच्या कालावधीपर्यंत वापरता येईल. त्यासाठी त्यांना शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने मूर्त्या घडविणारे मूर्तीकार, साठवणूकदार असल्याबाबतचे हमीपत्र महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे. या मूर्तीकारांनी त्यांच्या मंडपाबाहेर, ‘येथे पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत’ अशा आशयाचा ३x५ फूट एवढ्या आकारमानाचा फलक लावणे बंधनकारक आहे. शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविण्याचे तसेच साठविण्याचे वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश सन २०२३ च्या नवरात्रौत्सवादरम्यान देखील लागू राहणार असून त्यासाठी स्वतंत्र निर्देश देण्यात येणार नाहीत. सन २०२३ च्या सार्वजनिक उत्सावांसंदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास, संबंधित व्यक्ती पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये कारवाईस पात्र ठरतील.

घरगुती गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक

घरगुती गणपतींची उंची ४ फुटापर्यंत असावी तसेच घरगुती गणपती मूर्ती शाडू किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच घडविणे बंधनकारक आहे. सर्व घरगुती गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक आहे. कमी उंचीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असेही परिमंडळ २ चे उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक बिरादार यांनी कळविले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.