Home समाजकारण G20 शिखर परिषदेच्या मेळाव्यातील प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल, पैठणी साडी

G20 शिखर परिषदेच्या मेळाव्यातील प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल, पैठणी साडी

22

नवी दिल्ली येथे नजीकच्या काळात होऊ घातलेल्या G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने, दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत ‘हस्तकला मेळावा’ (प्रदर्शन तसेच विक्री) आयोजित करण्यात आला आहे. G20 शिखर परिषदेच्या बैठका सुरु असताना नवी दिल्लीमध्ये भरणार असलेल्या या हस्तकला मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल तसेच पैठणी साडी या उत्पादनांचा  समावेश आहे.

महाराष्ट्रात तयार केली जाणारी कोल्हापुरी चप्पल म्हणजे अत्यंत कलात्मकतेने हाती तयार करण्यात येणारी चामड्याची पादत्राणे आहेत. स्थानिक पातळीवर विशिष्ट रंगात रंगवल्या जाणाऱ्या या पादत्राणांना वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या रंगांच्या वापरामुळे अत्यंत अस्सल स्वरूप देण्यात येते. कोल्हापुरी चपला म्हणजे पुढील बाजूने खुल्या असणाऱ्या अत्यंत लोकप्रिय पद्धतीच्या चपला आहेत. सजावटीसाठी वापरलेले घटक आणि अत्यंत उत्कृष्ट कारागिरी यांचा आकर्षक संगम असलेल्या या चपला सुरेख आणि आरामदायी चपलांची आवड असणाऱ्यांना फार भावतात.

(हेही वाचा G20 बैठकीत झळकणार ऋग्वेदाचे हस्तलिखित)

‘महाराष्ट्र राज्याचे महावस्त्र’ असा मान मिळवलेली पैठणी साडी अत्यंत उच्च दर्जाचे, आकर्षक रंग असलेले रेशीम धागे आणि सोन्याची जर यांच्या विणकामातून तयार होते. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पैठण हे मध्ययुगीन नगर पैठणीचे जन्मस्थान आहे. पैठणीचा काठ आणि पदर यांच्यावर असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या आकृतिबंधांमुळे ही साडी इतर साड्यांपासून वेगळी ओळखता येते. या आकृतिबंधांमध्ये मुख्यतः मोर, पोपट तसेच कमळे यांचा समावेश असतो. गेल्या अनेक शतकांपासून सहावारी किंवा नऊवारी पैठणीला महाराष्ट्रातील नववधूंची पसंती मिळते आहे.

हस्तकला मेळाव्याविषयी माहिती

प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये भरवण्यात येणाऱ्या या हस्तकला मेळाव्यात भारताच्या विविध भागांतील कलाकुसरीच्या वस्तू मांडण्यात येणार असून त्यात एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी), भौगोलिक मानांकन मिळवलेली उत्पादने तसेच महिला आणि स्थानिक कलाकारांनी घडवलेली उत्पादने यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. G20 शिखर परिषदेसाठी दिल्लीमध्ये आलेले प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी यांना या हस्तकला मेळाव्याला भेट देण्याची तसेच स्थानिक पातळीवर पुरवठा करण्यात आलेल्या या उत्पादनांची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ भारतातील उत्पादनांची जागतिक मंचावर जाहिरात करण्यासाठीच नव्हे तर स्थानिक कारागिरांना नव्या आर्थिक तसेच बाजारपेठविषयक संधी खुल्या करुन देण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!