-
ऋजुता लुकतुके
ITR Filing Deadline Today : आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याच्या अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने करदात्यांना वेळेत रिटर्न दाखल करण्यासाठी क्रिकेटची उपमा देत एक अनोखे आवाहन केले आहे. विभागाने म्हटले आहे की, “आज आयटीआरची अंतिम मुदत चुकवणे म्हणजे हिट विकेट होण्यासारखे आहे,”आणि करदात्यांनी “फ्री हिट फायलिंग”चा लाभ घ्यावा.
आयकर विभागाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात करदात्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहण्याचा सल्ला दिला आहे. विभागाने स्पष्ट केले की, वेळेत आयटीआर दाखल केल्यास दंड, व्याज आणि इतर करसंबंधित अडचणी टाळता येऊ शकतात.
विभागाने यंदा ई-फायलिंग पोर्टल सुरळीतपणे कार्यरत असल्याचेही अधोरेखित केले. गेल्या काही वर्षांत अंतिम आठवड्यात पोर्टल स्लो होणे, लॉगिन अडचणी, ओटीपी विलंब आणि रिटर्न सबमिट करताना समस्या निर्माण होत होत्या. मात्र यंदा पोर्टल तुलनेने स्थिर असल्याने करदात्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Indian Hockey Team Orange Jersey : हॉकी संघाची नवीन जर्सी केशरी रंगांची, माजी खेळाडूंकडून होतोय विरोध )
आयकर विभागाच्या संदेशात “फ्री हिट” ही संकल्पना वापरत, वेळेत आयटीआर दाखल करणे ही अतिरिक्त संधी असल्याचे सांगण्यात आले. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न भरल्यास करदात्यांना उशिरा फायलिंग शुल्क, व्याज आणि काही करसवलती गमावण्याचा धोका टाळता येईल.
तज्ज्ञांच्या मते, आयटीआर दाखल करण्यापूर्वी फॉर्म १६, फॉर्म २६एएस, AIS (Annual Information Statement), TIS (Taxpayer Information Summary), बँक खाते प्री-व्हॅलिडेशन आणि ई-व्हेरिफिकेशन या बाबी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीचा ITR फॉर्म निवडणे, TDS तपशील न जुळवणे किंवा ई-व्हेरिफिकेशन न करणे यामुळे रिटर्न प्रक्रिया विलंबित होऊ शकते.
आयकर विभागाने करदात्यांना “लास्ट ओव्हरपर्यंत थांबू नका” असा स्पष्ट संदेश दिला आहे. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न दाखल करून ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय असल्याचे विभागाने म्हटले आहे.
क्रिकेटच्या भाषेत दिलेल्या या संदेशामुळे आयटीआर फायलिंगबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, वेळेत रिटर्न दाखल करणे म्हणजेच “हिट विकेट” टाळून “फ्री हिट”चा फायदा घेणे, असा विभागाचा मुख्य संदेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

