Irshalgad Landslide : मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर; आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

मुसळधार पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडथळा

176
Irshalgad Landslide : मृतांच्या नातेवाईकांना राज्यसरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर; आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalgad Landslide)  गावावर दरड कोसळल्याने खूप मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या सात जणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आज (२० जुलै) सकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

गेल्या दोन – तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalgad Landslide)  गावावर दरड कोसळल्याने खूप मोठी दुर्घटना घडली आहे.

(हेही वाचा – Irshalgad Landslide : रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकली; मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी दाखल)

रायगड जिल्ह्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल म्हणजेच बुधवार १९ जुलै रोजी रात्री उशिरा दरड (Irshalgad Landslide) कोसळली. ही दरड कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. रात्री मुसळधार पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता मात्र आता सकाळी उजाडल्यानंतर तिथल्या बचावकार्याला वेग आला आहे.

लागेल ती मदत करणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील दुर्घटनाग्रस्त इर्शाळगड गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या घटनेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना भेटून त्यांना धीर दिला. त्यांना लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे सांगून मुख्यमंत्र्यानी त्यांना आशवस्त केले. तसेच घटनास्थळी मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचना देखील दिल्या.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

रायगडातील इर्शाळवाडीवर (Irshalgad Landslide) ही अत्यंत दुर्गम भागातील वस्ती आहे. त्यामुळे तेथील बचावकार्यात अडचण येत आहे. या वाडीत एकूण ४० ते ४५ घरं होती. त्यातील १४ ते १५ घरं या दरडीखाली अडकले आहेत. आतापर्यंत ९८ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेतील सर्व जखमींचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.