वाढते झुंडबळी, अफवांना समाजकंटकांकडून दिले जाते खतपाणी?

75

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधूंचा अफवांमुळे माॅबलिंचींगमध्ये जीव गेला, सोलापूर जिल्ह्यात अफ़वामुळे तीन साधूंना झुंडीला सामोरे जावे लागले होते, तर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे या अफवांमुळे दोन महिलांना मुले चोरीच्या संशयावरून काही महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची घटना घडली आहे. सध्या मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा झपाट्याने पसरत आहे आणि या अफवांना समाजकंटकांकडून खतपाणी घातले जात आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत अनभिज्ञ

मागील काही आठवड्यापासून सोशल मीडिया आणि व्हाट्सअपवर तीन ऑडिओ क्लिप आणि मारहाणीचे विडिओ आणि मेसेजस मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला, तर दुसऱ्या क्लिपमध्ये एक पुरुष हिंदीमध्ये मुले चोरणाऱ्या टोळ्या शहरात फिरत असून त्यांनी अमुक ठिकाणाहून अमुक मुलांना पळवून घेऊन गेल्याचे सांगत आहे. तर काही व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओत महिलांना मारहाण करण्यात येत असून या महिला मुले चोरणाऱ्या टोळीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात हे ऑडिओ कुणाचे आहेत, त्यात बोलणारी माणसे कोण आहेत, हे कुणालाच माहित नाही. या ऑडिओत बोलणारी व्यक्ती हिंदीत बोलताना तिची भाषा थोडी वेगळी जाणवते. याचा अर्थ हा ऑडिओ नक्की कुणी बनवला याच्याबद्दल अद्याप कुणाला काही माहिती नसून केवळ आलेला ऑडिओ दुसऱ्या ग्रुपमध्ये व्हयरल करण्याचे काम अनेक जण करीत आहेत. व्हिडिओबाबतदेखील तसेच आहे. मारहाणीचे हे व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे, त्या व्यक्तीला किंवा महिलेला का मारले जात आहे आणि तो व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत देखील कुणाला काहीही माहिती नाही.

(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध)

अफवांमुळे एखाद्या निष्पापाचा जीव जाऊ शकतो

तसेच वृत्तवाहिन्यांचे काही वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरणाच्या घटनेचा व्हिडिओ काढून तो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून मुंबई, ठाण्यात अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यामागे नक्कीच काही समाजकंटक अफवा पसरवून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत मुंबईत अशी कुठलीही घटना घडलेली नसून, केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे म्हटले आहे, नागरिकांनी या अफवांना बळी पडू नये म्हणून काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या अफवांमुळे एखाद्या निष्पापाचा जीव जाऊ शकतो, पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात घडलेली घटना ही अफवांमुळॆ घडली आणि दोन साधूंचा मॉब लिंचिंगमध्ये जीव गेला. संपूर्ण गावातील पुरुष मंडळींना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील अफवांमुळे तीन साधूंना जमावाचा मार खावा लागल्याची घटना देखील नुकतीच घडली आहे. मुंबई, ठाण्यात सध्या अफवा पसरविल्या जात असून या अफवा कोण आणि का पसरवत आहे, अफवा पसरवून नागरिकांमध्ये तसेच पालकांमध्ये भीती निर्माण करण्यामागे या समाजकंटकाचा हेतू काय असावा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, तरी मुंबई, ठाणे पोलिसांच्या मोठ्या यंत्रणेकडून याचा तपास सुरु आहे. सायबरतज्ज्ञांची तसेच सायबर विभागाची मदत घेतली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.