अभियंत्यांचा निर्धार : कर्मचाऱ्यांना यापुढे मारहाण झाल्यास होणार कामबंद!

एका जरी वॉर्डातील कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला किंवा अपशब्द वापरला गेला, तर संबंधित शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील सर्व अभियंते कामबंद आंदोलन पुकारतील, असा इशारा अभियंत्यांच्या संघटनेनेने दिला आहे.

97

कुर्ला एल विभागातील महापालिका अभियंत्यांना धक्काबुक्की तसेच शिवराळ भाषा वापरण्यात आल्याने भाजप नगरसेवक हरिष भांदिग्रे आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक किरण लांडगे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जनतेच्या पाणी प्रश्नावर हा संघर्ष झालेला असून अशाप्रकारे कितीही केसेस आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत, असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले. मात्र, यापुढे एका जरी वॉर्डातील कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला किंवा अपशब्द वापरला गेला, तर संबंधित शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील सर्व अभियंते कामबंद आंदोलन पुकारतील, असा इशारा अभियंत्यांच्या संघटनेनेने दिला आहे.

दोनच दिवसांपूर्वी आम्ही अभियंत्यांची एक बैठक बोलावली होती. त्यांच्यावर झालेली मारहाण तसेच शिवराळ भाषा वापरण्यासंदर्भात चर्चा झाली. आता याप्रकरणात दोन नगरसेवकांविरोधात एफआयआर दाखल झाला असला, तरी अशा प्रत्येक घटनांमध्ये समोरच्याला जरब बसेल अशाप्रकारे कारवाई व्हायला हवा. त्यामुळे इथून पुढे ज्या वॉर्डात अभियंत्याला लोकप्रतिनिधींकडून मारहाण झाल्यास, त्या वॉर्डाशी संबंधित शहर, पूर्व उपनगरे तसेच पश्चिम उपनगरील सर्व अभियंते काम बंद आंदोलन पुकारतील. एकही अभियंता त्यानंतर काम करणार नाही. मग कोविड असो वा महापालिका निवडणूक.
– ऍड. सुखदेव काशिद, अध्यक्ष, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन

एल विभागातील अभियंत्यांना शिवीगाल केल्याच्या घटना 

भाजपाचे नगरसेवक हरीश भांदिर्गे यांनी या अभियंत्याला मागील मंगळवारी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.  प्रभाग क्रमांक १६४ मधील संजयनगर, नूरणी मशीद, सुंदरबाग, नवपाडा आदी भागात पिण्याच्या पाण्याची समस्या असून त्या अभियंत्यावर त्यांनी पाणी विकण्याचा आरोप करीत अभियंत्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याची  ऑडिओ क्लिप व्हायरल होताच अभियंत्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुखदेव काशिद यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हरिश भांदिर्गे यांच्याविरोधात महापालिकेच्यावतीने पोलिस एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर हरिश भांदिर्गे यांना अटक करून जामीनावर सोडण्यात आले होते. तसेच तत्पूर्वी म्हणजे ८ सप्टेंबर २०२१ रोजी कुर्ला हनुमान टेकडी परिसरात स्थानिक शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांच्या उपस्थित सहायक अभियंता(जलकामे)  नितीन कुलकर्णी यांनी अज्ञात व्यक्तीकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी १३ सप्टेंबर २०२१ रोजी स्थानिक पोलिस स्थानकात  तक्रार नोंदवण्यात आली.  त्यानुसार पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असल्याची माहिती म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुखदेव काशिद यांनी दिली आहे.

(हेही वाचा : कॅप्टन अमरिंदर सिंहांची ‘लढाई’ तून माघार!)

महापालिकेच्या विरोधात असंतोष 

याबाबत शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याची माहिती मिळाली, परंतु हा एफआयआर लोकांच्या पाणी प्रश्नाबाबत आहे. विभागातील लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरलेला आहे. त्यातून लोकांनी चिडून हा हल्ला केला. परंतु लोकांच्या पाणी प्रश्नांसाठी आपण कितीही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत आणि जोवर पाणी प्रश्न सुटत नाही तोवर आमचा संघर्ष सुरुच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.