ICSE results 2025: दहावीचा निकाल जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या कन्येनेही मारली बाजी

170

ICSE results 2025 : सीआयएससीई बोर्डाने इयत्ता 10वी (ICSE) आणि 12वी (ISC) च्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत दोन लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल cisce.org आणि results.cisce.org या वेबसाइट्सवर पाहता येतील. गुण डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि इतर माहिती लॉगिन पेजवर टाकावी लागेल. Captcha भरल्यानंतर त्यांचे गुण स्क्रीनवर दिसतील. ICSE आणि ISC च्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित परीक्षा जुलैमध्ये होणार आहेत. (ICSE results 2025)

(हेही वाचा – Maharashtra Day : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राजकीय संघर्ष तीव्र; महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनावरून नवा वाद)

निकालातील महत्त्वाचे मुद्दे –
आयसीएसईच्या देशात  2 हजार 803 शाळा होत्या. त्यामध्ये एकूण 252557 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल 99.09 टक्के लागला आहे. तर आयएससी बोर्डाच्या एकूण 1460 शाळा होत्या. यामध्ये एकूण 99 हजार 551 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 99.02 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. दोन्ही बोर्डाचे निकाल 99 टक्क्यांपेक्षा जास्त लागले आहेत. आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. एकूण मुलींपैकी 99.37 टक्के मुली परीक्षा पास झाल्या आहेत. दुसरीकडे मलांचा विचार केला तर त्यांची टक्केवारी 98.84 आहे. आयएससी बोर्डातही मुलींनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती –
महाराष्ट्रात आयसीएसई बोर्डाच्या 270 शाळा होत्या. त्यामध्ये 29282 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल 99.90 टक्के लागला आहे. तर आयएससी बोर्डाच्या राज्यात 77 शाळा आहेत. एकूण 3723 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये 99.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दिविजा फडणवीसला पडले 92.60% गुण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या कन्या दिविजा फडणवीस हिलाही दहावीच्या परीक्षेत तब्बल 92.60 टक्के गुण पडले आहेत. अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

डिजीलॉकरवर निकाल असा तपासा
निकाल पोर्टल results.digilocker.gov.in ला भेट द्या.
CISCE DigiLocker निकाल पृष्ठावर जा.
वर्ग प्रविष्ट करा आणि निकाल बटणावर क्लिक करा.
पुढील पानावर इंडेक्स क्रमांक, युनिक आयडी आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
निकाल पाहण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

(हेही वाचा – ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांना धक्का: जळगावात दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार Ajit Pawar गटात)

विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येईल
अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना त्यांचा CISCE बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. विद्यार्थ्यांना त्यांचा ISC युनिक आयडी टाइप करावा लागेल आणि तो CISCE ने दिलेल्या 09248082883 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर त्यांना तत्काळ त्यांच्या विषयवार गुणांसह एसएमएस निकाल मिळेल.

मार्क्स इम्प्रुव्हमेंटसाठी जुलैमध्ये देता येईल परीक्षा
ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारायचे आहेत त्यांना जुलै 2025 मध्ये कोणत्याही 2 विषयांच्या परीक्षेला बसता येईल. जे विद्यार्थी त्यांच्या निकालांवर पूर्णपणे समाधानी नाहीत ते त्या विषयांच्या उत्तरपत्रिका किंवा पेपर्सच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतील. उमेदवार CISCE ची अधिकृत वेबसाइट cisce.org ला भेट देऊ शकतात आणि मूल्यांकनासाठी अर्ज करण्यासाठी ‘सार्वजनिक सेवा’ या मेनू लिंकचा वापर करू शकतात.

3.5 लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर
आयएससी बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत झाल्या होत्या, तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत झाल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत 1.06 लाख विद्यार्थी बसले होते, तर दहावीच्या परीक्षेत 2.53 लाख विद्यार्थी बसले होते.

दहावीत 33%, बारावीत 35% गुण
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना ICSE मध्ये किमान 33% आणि ISC मध्ये किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी किमान गुण मिळवू शकत नाहीत ते नंतर सुधारणा परीक्षेला बसू शकतात.

(हेही वाचा – Indore Muslim Patient : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंदौरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल; म्हणाले…)

गुणवत्ता यादी आणि टॉपर्स जाहीर केले जाणार नाहीत
गेल्या वर्षी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर झाली नव्हती. बोर्डाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, विद्यार्थ्यांमध्ये नाहक स्पर्धा होऊ नये म्हणून बोर्डाने गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी देखील बोर्डाच्या परीक्षांनंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही. कोणत्याही टॉपरचे नाव देखील जाहीर केले जाणार नाही.

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर शेजाऱ्यांची साथ कुणाला ?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.