हैदराबादमध्ये (Hyderabad) फूड अॅडल्टरेशन सर्व्हिलन्स टीम (H-FAST) ने मोठी कारवाई करत १५ ठिकाणी छापे टाकून सुमारे ३००० किलो भेसळयुक्त चहा पावडर (Adulterated tea powder) आणि १५०० किलो कालबाह्य (एक्सपायर्ड) चहा जप्त केला आहे.
शुक्रवारी (२४ एप्रिल २०२६) झालेल्या या कारवाईत पोलिसांनी १० आरोपींना अटक केली असून, हे लोक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत होते. हा टोळा आसाम (Assam), कोलकाता (Kolkata) आणि केरळ (Kerala) येथून अत्यंत निकृष्ट दर्जाची चहाची पानं खरेदी करून त्यात धोकादायक रसायनांची भेसळ करत होता.
(हेही वाचा – US India Relations : अमेरिकेचं भविष्य भारतासोबत; अमेरिकेच्या माजी मंत्र्याचे मोठे विधान)
तपासात उघड झाले की, आरोपी स्वस्त चहामध्ये सनसेट यलो आणि टार्ट्राझीनसारखे कृत्रिम रंग, गुळाचे द्रावण आणि वापरलेली जुनी चहाची पानं मिसळत होते. हे मिश्रण नामांकित ब्रँडच्या बनावट पॅकेटमध्ये भरून रस्त्याकडील दुकाने आणि हॉटेल्समध्ये पुरवले जात होते.
डॉक्टरांच्या मते, अशा चहाच्या सेवनामुळे पोटाचे आजार, अॅलर्जी आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत सांगितले की, खऱ्या चहाची ओळख थंड पाण्यात करून पाहता येते.
भेसळयुक्त चहा पाण्यात टाकताच लगेच रंग सोडतो. सध्या अधिकाऱ्यांनी लोकांना फक्त विश्वासार्ह दुकानांतूनच चहा खरेदी करण्याचा सल्ला दिला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, जेणेकरून या जाळ्यातील इतर आरोपींनाही अटक करता येईल. (Hyderabad)


