Ganeshotsav 2023 : मुंबई, पुणे आणि कोकणासह संपूर्ण राज्यात श्री गणेशाचे उत्साहात स्वागत

16

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली, गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यभर श्री गणेश विराजमान झाले आहेत. या उत्सव ११ दिवस चालणार आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) लागणारे साहित्य व मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच शहरांतील मुख्य बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. राज्य पोलिस ‎प्रशासनाने देखील सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मुंबई आणि पुण्यातून कोकणाकडे जाणारे रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे यंदा खरिप हंगामात मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना आस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांनी वेढले आहे. त्यामुळे अवघ्या जगाचे संकट दूर करणाऱ्या विघ्नहर्त्याने शेतकऱ्यांवर आलेले हे अस्मानी संकट दूर करावे, असे साकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाकडे केले. राज्यातील शेतपिके पावसाअभावी करपली गेली असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. गणेश चतुर्थी या सणाच्या प्रसंगावर शेतकऱ्यांचे भरड पिके मुग व उडीद काढण्यास येते. ज्यातून त्याला या सणांमध्ये आर्थिक मदत मिळते, परंतु यावर्षी पाऊसच न झाल्याने ही पिके आलीच नाहीत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून त्याला आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे दानवे म्हणाले. देशातील केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने शासन करत आहे. जनतेच्या प्रश्नांपासून ते सतत पळ काढत आहेत. महागाई व शेतकऱ्यांवर आलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीकडे डोळेझाक करत आहे. लोकांच्या दैनंदिन समस्यांकडे केंद्र शासन दुर्लक्ष करत असल्याने पुढच्या गणेश चतुर्थी पर्यंत हे हुकूमशाही व जनता विरोधी सरकार हटवणार, असा इशारा दानवे यांनी दिला.

गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार, शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकातून (अलका चित्रपटगृह) टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगर भागातून स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी वेधशाळा चौक, शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौकमार्गे पुणे स्टेशनकडे किंवा नेहरु रस्त्याने स्वारगेटकडे जावे, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणारे दुचाकीस्वार महापालिका भवन येथील टिळक पूल, नदीपात्रातील रस्त्यावरुन अलका चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील. बाजीराव रस्ता, तसेच केळकर रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चौक, फुटका बुरूज चौक, गाडगीळ पुतळा, कुंभारवेस मार्गे इच्छितस्थळी जावे.

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते बेलबाग चौक, रामेश्वर चौक ते मंडई, शनिपार चौक, सेवासदन चौक ते अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक ते फुटका बुरूज चौक या भागात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. 20 ते 27 सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी 5 नंतर गर्दी ओसरेपर्यंत कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज रस्ता, महापालिका कार्यशाळा चौक, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कोहिनूर चौक ते भगवान महावीर चौक दरम्यान असलेल्या एकेरी वाहतुकीचे आदेश शिथिल करण्यात येणार आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर दाखल झाले आहेत. त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेत राज्याच्या विकासासाठी प्रार्थना केली.

(हेही वाचा Women’s Reservation Bill : महिला आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर; श्रेयवादावरून गदारोळ होऊन कामकाज तहकूब)

नाशिक जिल्ह्यातील 800 हून अधिक गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेनुसार गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बळकट करण्यास मदत होत आहे. पोलिसांनी शहर व ग्रामीण भागात सुमारे 5 हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दल व दशहतवादविरोधी पथकाचा समावेश आहे. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी पोलिसही तयार झालेत. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या काळात तब्बल 2 हजार 700 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

पुण्याचे ग्रामदैवत तथा मानाचा पहिला गणपती असणाऱ्या कसबा गणपतीची मंगळवारी सकाळी 8.30 वा. ढोल ताशांच्या मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढत हा मानाचा गणपती विराजमान झाला. पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचीही मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 10 वाजता मिरवणूक काढण्यात आली. श्रींची मिरवणूक केळकर रस्त्यावरवरून सुरू झाली. त्यानंतर ती तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराकडे आली. त्यानंतर आता बाप्पा मंडपात विराजमान होणार आहे. 12:30 पर्यंत श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचीही मिरवणूक निघाली. ढोल-ताशाच्या गजरात 9 वाजता श्री च्या मूर्तीची मिरवणूक निघाली. तर 11:50 वाजता श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावर्षी या मंडळाचे 132 वे वर्ष आहे. दगडूशेठ गणपतीची मुख्य मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती होईल आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुले करण्यात येईल.

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरीही गणरायाचे आगमन

महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. राज यांनी ‘शिवतीर्थ’ या आपल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना केली. यावेळी त्यांनी गणरायाचे सहकुटुंब पूजन केले. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवास्थानी गणरायाचे आगमन झाले. दानवे कुटुंबीयांनी मोठ्या भक्तीभावाने आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज तुमच्या फास्टॅगमधून टोलची रक्कम कापली गेली असेल, तर ती परत मिळेल. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जवळपास 350 मंडपांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. अरुंद रस्ता व वाहतुकीच्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. काल रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. सकाळपासून भाविकांची संख्या वाढत आहे. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नाशिकच्या येवला शहरासह परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन झाले आहे. येथील विद्यार्थ्यांनी लेझीम, झांज आदी खेळांची प्रात्यक्षिक दाखवून गणरायाचे स्वागत केले. काही विद्यार्थ्यांनी महादेव व गणपतीची वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील वीर मराठा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने यावर्षी कागदापासून गणेशाची साडे 5 फूट उंचीची पर्यावरणपुरक मूर्ती साकारली. मंडळाने यासाठी सेंचुरी पेपरचा वापर केला असून, याद्वारे त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.

नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरातही गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नागपूरचे ग्रामदैवत असणाऱ्या टेकडी गणेश मंदिरात सकाळपासूनच गणेश उत्सवाला सुरवात झाली आहे. कोल्हापुरात मोठ्या उत्साहात गणेशाचे आगमन सुरू आहे. ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करत भाविक गणेश मूर्ती आपापल्या घरी नेत आहेत. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या बेस्टने रात्रभर बस सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बेस्टने मुंबईतील 9 मार्गांवर 27 अतिरिक्त बसगाड्या सुरु केल्या आहेत. 19 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत या अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. कोकणातील परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. हा उत्सव कोकणात अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 71 हजार 789 घरगुती, तर 31 सार्वजनिक गणपतींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.