मुंबईत गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी; मुंबई पोलिसांची तारेवरची कसरत

102
दोन वर्षानंतर मुंबईत गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षी मुंबईत गणेश दर्शनासाठी अफाट गर्दी उसळली असून, त्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे वाढल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. यंदा मुंबईत भक्तांचा महापूर आलेला असताना, मुंबईची सुरक्षा बघणाऱ्या मुंबई पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे राज्यात कुठलाही उत्सव साजरा करण्यात आलेला नाही. यंदा मात्र कोरोनाचे संकट दूर होऊन सर्वकाही पूर्ववत झालेले आहे. त्यात राज्य शासनाने सर्व निर्बंध हटवल्यामुळे राज्यात मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला जात आहे. गोकुळाष्टमी नंतर मुंबईत खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरुवात झाली. मुंबईतील गणेशोत्सव हा देशभरात प्रसिद्ध असून या वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असताना, सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबई पोलीस दलातील अंमलदारांना विनंती वरून जिल्हा पातळीवर बदल्या केल्यामुळे मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. मुंबईत राज्य राखीव दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे. परंतु मुंबईतील गणेश मंडळे, विसर्जनस्थळ, समुद्र किनारे, चौपाटया या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात मुंबईत अतीमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. पोलीस दलात मनुष्यबळ कमी असल्यामुळे मुंबई पोलिसांवर ताण पडत आहे.
मुंबईतील लालबाग, परळ, काळाचौकी हा परिसर गणेशोत्सवाच्या काळात फुलून जातो. मुंबई ठाणेसह राज्यातील गणेश भक्त हे या परिसरात गणेश दर्शनासाठी येत असल्यामुळे या परिसराला महत्व प्राप्त झाले आहे. येथील लहान मोठ्या मंडळातदेखील मोठी गर्दी उसळत आहे. काही मंडळांचे नियोजन शून्य असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नाही. अशा मंडळाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असतो. परंतु वाढत्या गर्दीपुढे पोलीसदेखील हतबल होत आहेत. चिंचपोकळी येथील चिंतामणी या ठिकाणी शनिवारी रात्री झालेल्या प्रकारामुळे मंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. शनिवारी अचानक उसळलेल्या गणेश भक्तांच्या गर्दीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही. त्यातून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.