हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के

148
हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली जिल्हयात आज म्हणजेच शनिवारी सकाळी 7 वाजून 4 मिनीटांनी 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. अनेक गावांतून मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या पहिल्या धक्क्यानंतर पुन्हा 7 वाजून 12 मिनिटांनी भूकंपाचा हादरा बसला आहे. दरम्यान यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.

हिंगोलीत शनिवारी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी भुगर्भातून मोठा आवाज झाला. त्यानंतर सात मिनिटांनी लगेचच सात वाजून १२ मिनिटांनी दुसरा आवाज झाला. जिल्हयातील पिंपळदरी, आमदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, कंजारा, पुर, काकडदाभा, फुलदाभा, जलालधाबा, नांदापूर, पांगरा शिंदे, कुरुंदा, सिंदगी, पोतरा, लक्ष्मणनाईकतांडा, तामटीतांडा, कुपटी, वापटी, हिंगणी, खेड यासह परिसरातील गावांमधून मोठा आवाज झाला तर हिंगोली शहरापर्यंत याचे धक्के जाणवले आहेत.

(हेही वाचा – IND vs WI : भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; यशस्वी जयस्वालची पदार्पणात शतकी खेळी)

रिश्टर स्केलमध्ये या भुकंपाची तीव्रता 3.6 एवढी नोंदवली आहे. त्याची खोली 10 किलोमीटर एवढी असल्याचे भुकंप मापकामध्ये याची नोंद झाली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन वेळा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्हयात गेल्या 5 वर्षापासून भुगर्भातून आवाज येण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अचानक जमिनीतून गडगडाट आवाज येऊन जमीन हादरण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. सुदैवाने आजपर्यंत या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्त हानी झालेली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.